ट्रॅक्टर ट्रॉली मिळाली नाही तर करायचे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:24+5:302021-08-21T04:21:24+5:30
जळगाव : दिवसा रेकी करून रात्री दहा वाजेनंतर ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेणा-या चौघांच्या मुसक्या आवळण्यात एलसीबीच्या पथकाला यश आहे ...

ट्रॅक्टर ट्रॉली मिळाली नाही तर करायचे घरफोडी
जळगाव : दिवसा रेकी करून रात्री दहा वाजेनंतर ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेणा-या चौघांच्या मुसक्या आवळण्यात एलसीबीच्या पथकाला यश आहे आहे. चौघांकडून चोरी केलेल्या नऊ ट्रॅक्टर ट्रॉल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. ट्रॅक्टर ट्रॉली मिळाली नाही तर चोरटे...चक्क घरफोडी व डीपी चोरी करित असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. संजय तुकाराम धनगर (४२, ता.नरवेल, ता. मुक्ताईनगर), कलीम कमरोद्दीन शेख (४२), गणेश वसंत महाजन (३५), प्रमोद सुकदेव महाजन (३८, सर्व रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध भागातून ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला जात असल्याची घटना घडत होत्या. या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केल्या होत्या. त्यातच संजय धनगर हा व्यक्ती रावेर, यावल, जामनेर तालुक्यात तसेच बुलढाणा जिल्ह्यात शेतक-याचे शेती कामासाठी वापरे जाणारे ट्रॅक्टर व ट्रॉल्या चोरून त्यांना नवीन रंग देवून त्यांची चांगल्या किंमतीत विक्री करित असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करून धनगर याचा शोध घेण्यास सांगितले़ त्यानुसार एलसीबीचे पथक हे गेल्या सहा दिवसांपासून धनगर याच्या मागावर होते. अखेर शुक्रवारी त्याला पोलिसांनी धरणगावातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने ९ ट्रॉली व एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबूली दिली. त्यानंतर कलीम शेख, गणेश महाजन, प्रमोद महाजन यांनाही अंतुर्ली गावातून एलसीबीच्या पथकाने अटक केली. दरम्यान, चौघे शुक्रवारी धरणगाव व चोपड्यात तालुक्यात चोरी करणार असल्याची माहिती समोर आली.
दिवसा रेकी, रात्री दहानंतर चोरी
संजय धनगर हा टोळी प्रमुख आहे. तो कोणत्या शेतात किंवा गावाबाहेर ट्रॅक्टर ट्रॉली आहे, याची दुचाकीने रेकी करून आल्यानंतर रात्री दहा वाजेनंतर तो गणेश आणि प्रमोदच्या मदतीने ट्रॅक्टर ट्रॉली काढायचा. नंतर अंतुर्ली येथे ट्राली नेऊन तिला नवीन रंग देवून तो चांगल्या किंमतीत कलीम शेख याच्या मदतीने विकत असे. ज्या दिवशी चोरीसाठी ट्रॉली मिळाली नाही, त्यावेळी हे चौघे घरफोडी व डीपी चोरी करित असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
यांनी केली कारवाई
एलसीबीचे विजय पाटील, राजेंद्र पाटील, अशोक महाजन, रवींद्र गायकवाड, वसंत लिंगायत, नरेंद्र वारूळे, प्रदीप पाटील, जयवंत चौधरी, विजय चौधरी, दीपक पाटील, उमेशगिरी गोसावी, किरण चौधरी, योगेश वराडे आदींनी ही कारवाई केली आहे.