तमाशाच्या फडातील बाईतही मला आई दिसते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:30+5:302021-07-29T04:16:30+5:30
भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंच्या माताेश्री द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीनदिवसीय द्वारकाई ऑनलाइन व्याख्यानमाला घेतली ...

तमाशाच्या फडातील बाईतही मला आई दिसते!
भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंच्या माताेश्री द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीनदिवसीय द्वारकाई ऑनलाइन व्याख्यानमाला घेतली जाते. त्यात मंगळवारी ‘वेदनेचा तळ शाेधणारी कविता’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफताना दंगलकार चंदनशिवे हे बाेलत हाेते. प्रास्ताविक उमेश नेमाडेंनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चुडामण चाैधरी हाेते.
सूत्रसंचालन समन्वयक गणेश फेगडे यांनी केले. तंत्रसाहाय्य पुणे बालभारतीचे सदस्य डाॅ. जगदीश पाटील, भुसावळच्या काेटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. गिरीश काेळी यांचे लाभले.
कवितेतून उलगडला वेदनेचा अर्थ
‘पाखरांच्या चाेचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता’ या ओळींतून दंगलकार चंदनशिवेंनी रसिकांना साद घातली. माणसाला उजेडात आणण्याचं सामर्थ्य शब्दांत आहे. पण, ते कसे वापरावे यासाठी डाेळे उघडे ठेवायला हवे. ‘दिवाळीला घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटते मला, लाेक हरामी घराचा रंग पाहून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी सगळं घरच पांढरंशुभ्र केलं...मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलाे’ या कवितेतून त्यांनी जातीभेदाची वेदना मांडून त्यावरचं उत्तरही दिलं. हृदयाचा कप्पा उघडणारे बंद शाळेचे मनाेगत, काेराेनाकाळात बंद झालेल्या शाळेचे मनाेगत, त्यांनी ‘मी तुमची शाळा बाेलतेय’ कवितेतून मांडले. ‘भिंती मुक्या झाल्यात फळा रुसलाय रे, खडू उमटलाच नाही. कित्येक काळ ताटातूट झालीय त्यांची’ या ओळी थेट हृदयाला भिडल्या. ‘मी वेदनेचा बाजार मांडणारा माणूस नसून बाजाराच्या वेदना मांडणारा सरळ साधा कवितेचा हमाल आहे. या कवितेतून त्यांनी कवितेची पालखी वाहून नेण्याचा आनंद असल्याचे अधाेरेखित केले.
‘पांडुरंगा’ या कवितेतून शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय ताकदीने मांडण्याचा प्रयत्न केला.
‘तमाशा’ कवितेतून मांडली पाेटाची वेेदना... तमाशाशी माझं जवळचं नातं आहे. भूक लागली म्हणजे माध्यान्हीचा चंद्र दूरवर आता भाकरीसारखा दिसू लागताे, असं सांगत चंदनशिवे यांनी ‘तमाशा’ नावाची कविता सादर केली. त्यातील ‘मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात, माेगऱ्याचे चांदणे माळते मी वेणीच्या अंबरात’ व ‘तमाशा’च्या फडामध्ये पायात घुंगरू बांधून आयुष्यभर नाचणाऱ्या बाईत मला आई दिसते’, या ओळी रसिकांच्या थेट हृदयाला भिडल्या.
उद्या तृतीय पुष्प आबिद शेख गुंफणार...
तीनदिवसीय द्वारकाई ऑनलाइन व्याख्यानमालेचे समाराेपाचे तृतीय पुष्प २९ जुलै राेजी सवना (जि. यवतमाळ) येथील गझलकार आबिद मन्सूर शेख हे सकाळी १०.३० वाजता झूम मीटिंगद्वारे गुंफतील. ‘अशी बहरली कविता’ हा त्यांचा विषय आहे.