पायी चालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघा, कंबरदुखी जडली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:51+5:302021-09-24T04:20:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये पायी चालण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे कमी वयातच गुडघे आणि कंबरदुखी ...

पायी चालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघा, कंबरदुखी जडली !
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये पायी चालण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे कमी वयातच गुडघे आणि कंबरदुखी असे आजार जडले आहेत. कोरोनाच्या काळात तंदुरुस्तीसाठी व्यायाम करणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली. लॉकडाऊनमुळे सर्वचजण घरात अडकले. अनेकांना विविध व्याधी जडल्या. आता मात्र वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यायाम म्हणून का होईना, चालण्याचा सल्ला देत आहे.
अनेकजण घराच्या जवळच जायचे असेल तरीदेखील गाडीचा वापर करतात. त्यामुळे अनेकांची पायी चालण्याची सवय मोडली आहे. अनेकांना पाचशे मीटरचे अंतर चालणेदेखील कठीण जाते. पायांच्या हालचाली न केल्याने अनेकांना गुडघेदुखी आणि कंबरदुखीचे आजार जडले आहेत.
त्यामुळे सर्वच वयोगटांतील स्त्री आणि पुुरुषांनी पायी चालले पाहिजे.
म्हणून वाढले हाडांचे आजार
पायी न चालल्याने गुडघेदुखी, तसेच इतर आजार जडतात. पायी चालल्याने पायांचे स्नायू बळकट होतात आणि त्यामुळे हा गुडघे आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. याबाबत बोलतांना अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मनीष चौधरी यांनी सांगितले की, ज्यांना गुडघेदुखीचे आजार आहेत त्यांनी कडक पृष्ठभागावर चालू नये, डांबरी रस्ते हे चालण्यासाठी टाळावे, त्यांनी लॉन किंवा माती यावर जास्त चालावे. त्यासोबतच ज्यांना कॅलरी जास्त घालवायच्या असतील तर इतर व्यायाम प्रकार केले पाहिजे. पायी चालण्यासोबतच सायकलिंग, धावणे यासारखे व्यायाम प्रकार करावेत. ज्या व्यायामाने घाम येतो, असे व्यायाम करण्याचा सल्लाही डॉ. चौधरी यांनी दिला.
ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांच्यासाठी...
ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांनी एकाच जागेवर पायांच्या हालचाली कराव्यात, सायकल चालवीत असल्याची कृती करावी, प्राणायाम करावा, असेही डॉ. मनीष चौधरी यांनी सांगितले.