पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: July 15, 2014 12:25 IST2014-07-15T12:25:17+5:302014-07-15T12:25:17+5:30

हापूर येथील विवाहितेची तिच्या पतीने निर्घृण हत्या करून स्वत: विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. १३ रोजीच्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली.

Husband's suicide attempt by killing his wife | पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

 जामनेर : तालुक्यातील शहापूर येथील विवाहितेची तिच्या पतीने निर्घृण हत्या करून स्वत: विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. १३ रोजीच्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील गारखेडा येथील माहेर असलेल्या सरला (वय १८) हिचा तीन महिन्यांपूर्वीच शहापूर येथील दीपक काशिनाथ जाधव यांच्याशी विवाह झाला होता. सरलाची मोठी बहीणही दीपकच्या मोठय़ा भावाला दिली होती. एकाच घरात दोघी बहिणी सुखी राहतील अशी आशा तिच्या माहेरील लोकांना होती. घर छोटे असल्याने दीपक व सरला त्यांच्या जुन्या घरी रात्री झोपायला जात. हे घर थोड्या लांब अंतरावर होते. सरला नेहमीच सकाळी ५ वाजता उठून यायची. आज १४ रोजी ती ६ वाजेपर्यंत न आल्याने मोठी बहीण तिला उठविण्यासाठी गेली असता सरलाला तिच्या पतीने कायमचे झोपविले असल्याचा प्रकार उघडकीस आला. 
रागीट स्वभावाचा असलेला दीपक नेहमीच इतरांशी गुर्मीतच बोलायचा. यामुळे तो काहीसा एकटा एकटाही राहायचा. दीपकने मध्यरात्री पलंगावर झोपलेल्या सरलाला मोबाइल चार्जरच्या वायरीने फाशी दिली. यापुढे जाऊन त्याने व्यायामाच्या लोखंडी डंबेल्सने तिच्या डोक्याच्या मागील बाजूस, कपाळावर, गालावर, ओठावर, हनुवटीवर वार करून जीवे मारले. पत्नीच्या हत्येनंतर त्यानेही विषारी पदार्थ सेवन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. गावकर्‍यांना कळताच त्यांनी दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सरला मृत झाली होती, तर दीपकला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.घटनेची माहिती मिळताच सरलाचे आई-वडील, भाऊ, नातलग शहापूरला दाखल झाले व एकच आक्रोश सुरू झाला. आमदार गिरीश महाजन यांनी घटनास्थळी येऊन कुटुंबाचे सांत्वन केले. 
गावातील पहिलीच घटना
शहापूर येथील काशिनाथ चांगो जाधव यांच्या कुटुंबाचा शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. मेहनती कुटुंब म्हणून गावात या कुटुंबाचा परिचय आहे. पत्नीच्या हत्येची ही पहिलीच घटना गावात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 
ज्या लोखंडी डंबेल्सने दीपकने सरलाच्या शरीरावर वार केले तसेच मोबाइल चार्जरच्या वायरीने गळफास दिला ते साहित्य पोलिसांनी घटना स्थळावरून जप्त केले आहे. डीवायएसपी रमेश गावीत यांनी घटना स्थळी येऊन पाहणी केली. 
पीआय रफीक शेख, विठ्ठल काकडे, संजय तायडे तपास करीत आहेत. सरलाची हत्या व स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या दीपक विरुद्ध धोंडू तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्येची मालिका
तालुक्यात ३0 जून रोजी पळासखेडे मिराचे येथे पत्नीने पतीची १ जुलै रोजी जामनेर येथे, तर पतीने पत्नीची २ रोजी सुनसगाव येथे पतीने पत्नीची आणि ही अशा चार हत्येच्या घटना तालुक्यात १५ दिवसात झाल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Husband's suicide attempt by killing his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.