पती दवाखान्यात, वडील आजारी; इकडे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:40+5:302021-08-20T04:21:40+5:30
जळगाव : पती पुण्याला दवाखान्यात गेलेले तर वडील आजारी असल्याने मुलगी माहेरी त्यांची शुश्रूषा करण्यासाठी गेली असता इकडे काजल ...

पती दवाखान्यात, वडील आजारी; इकडे घरफोडी
जळगाव : पती पुण्याला दवाखान्यात गेलेले तर वडील आजारी असल्याने मुलगी माहेरी त्यांची शुश्रूषा करण्यासाठी गेली असता इकडे काजल विकास भोळे (वय ३५) यांच्या योगेश्वर नगरातील घरात चोरट्यांनी धुडगूस घालून २ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.
योगेश्वर नगरात काजल भोळे या पती विकास चंद्रकांत भोळे, मुलगा धवल व चैतन्य यांच्यासह वास्तव्याला आहेत. पती विकास यांचा अपघात झाल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते पुणे-जळगाव असे सतत ये-जा करतात. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजता ते पुणे येथे उपचारासाठी गेले तर प्रेमचंद नगरात राहणारे वडील आजारी असल्याने काजल या दोन्ही मुलांना घेऊन त्यांची शुश्रूषा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे घराला कुलूप होते. बुधवारी काजल यांचा मुलगा घरी आला असता घर उघडे होते व साहित्य अस्ताव्यस्त होते. त्याने ही माहिती काजल व शेजारी राहणाऱ्या शीतल बोरोले यांना दिली तर दुसरे शेजारी प्रमोद पाटील यांनी शनी पेठ पोलिसांना घटनेची माहिती कळविली. पोलिसांचे पथक तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञही घरी दाखल झाले.
दरम्यान, काजल भोळे यांनी घरात ठेवलेली रोकड व दागिने याची तपासणी केली असता ७५ हजार ५०० रुपये रोख व दागिने असा २ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक यशोदा कनसे करीत आहेत.