पातोंडा येथील शेकडो कुटुंबे रेशनकार्डापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST2021-09-10T04:21:29+5:302021-09-10T04:21:29+5:30
पातोंडा, ता. अमळनेर : पातोंडा येथील बहुसंख्य कुटुंबे रेशनिंग कार्डासह स्वस्त धान्य लाभापासून वंचित आहेत. अशा नागरिकांना रेशनिंग कार्डासह ...

पातोंडा येथील शेकडो कुटुंबे रेशनकार्डापासून वंचित
पातोंडा, ता. अमळनेर : पातोंडा येथील बहुसंख्य कुटुंबे रेशनिंग कार्डासह स्वस्त धान्य लाभापासून वंचित आहेत. अशा नागरिकांना रेशनिंग कार्डासह रेशन मिळावे, अशी मागणी सरपंच भरत देवाजी बिरारीसह ग्रामस्थांनी केली आहे.
सद्य:स्थितीत पातोंडा येथे दोन स्वस्त धान्य दुकाने आहेत. दोन्ही मिळून जवळजवळ अन्नसुरक्षा ७७५, अंत्योदय २३०, केसरी ३७५, पांढरे १४० अशी कार्डसंख्या असल्याचे समजते. दिवसेंदिवस गावाची लोकसंख्या वाढत आहे. एकत्र कुटुंबे विभक्त झाली आहेत. काही नागरिक कामानिमित्त बाहेरगावाहून कधीपासून आले असून ते कायमचे रहिवासी झाले आहेत. अशा लोकांना रेशनकार्ड नसल्याने रेशन मिळत नाही. तसेच काही ग्रामस्थांनी पुरवठा शाखेतून गेल्या काही महिन्यांपासून रेशनिंग कार्ड काढले आहेत, परंतु त्यांना रेशन माल मिळत नाही. केशरी कार्डधारकांनाही माल मिळत नाही. त्यामुळे बहुसंख्य कुटुंबे शासनाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या लाभापासून वंचितच असल्याचे समजते. अशा वंचित कुटुंबांना रेशनिंग कार्डसह माल मिळावा, अशी मागणी वंचित ग्रामस्थ व सरपंच भरत बिरारी यांनी केली आहे.