खेर्डेत शेकडो एकर पिके पुरात स्वाहा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:38+5:302021-09-06T04:19:38+5:30
चाळीसगाव : एरव्ही लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या सातमाळा डोंगर रांगांमधून वाहून येणाऱ्या ‘डोंगरी नद्यांनी’ ३१ ऑगस्टच्या पहाटे तीन ते पाचच्या ...

खेर्डेत शेकडो एकर पिके पुरात स्वाहा !
चाळीसगाव : एरव्ही लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या सातमाळा डोंगर रांगांमधून वाहून येणाऱ्या ‘डोंगरी नद्यांनी’ ३१ ऑगस्टच्या पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान थेट बाणगाव, खेर्डेत मुसंडी मारली. त्याअगोदर शेकडो एकरवरील पिकांनाही त्यांनी लोळविले. ११ जणांची घरे आणि संसारही वाहून घेऊन गेल्या. पूर ओसरल्यानंतरही पूरग्रस्तांच्या डोळ्यातला पूर अजूनही वाहतोच आहे.
खेर्डे गावात सहा दिवस उलटूनही शेती नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
रांजणगाव, बाणगाव, खेर्डे, रोकडे, लोंजे ही गावे सातमाळा डोंगर रांगांच्या तटबंदीने वेढलेली आहेत. ३० ऑगस्ट रोजी याच सातमाळा डोंगररांगांवर आभाळ फाटल्याने याच डोंगररांगांमधून वाहून येणाऱ्या लहान-मोठ्या नद्यांना पूर आला. ३१ ऑगस्टच्या पहाटे अतिवृष्टीचं बोट धरून आलेल्या पुराने धुमशान घालत शेकडो एकरवरील पिके काही मिनिटांत पाण्यात लोळविली.
पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने बहुतांशी शेत अक्षरशः खरडून निघाले आहेत. त्यामुळे काल-परवा हिरवा साज घेऊन डोलणारी शेत-शिवारं उजाड झाली असून, बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्ग प्रकोपात स्वाहा झाला आहे.
चौकट
फळबागा झाल्या उजाड
बाणगाव, खेर्डे येथे ऊस, केळी, मोसंबी, लिंबूच्या बागा आहेत. पुराने या बागांची दाणादाण उडाली आहे. सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी, ज्वारी आदी पिकेही पुराने मातीमोल करून टाकली आहेत.
१...खेर्डे येथे पुराचे संकट येऊन सहा दिवस उलटून गेल्यानंतरही शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.
चौकट
घरे गेली वाहून, राहिला चिखलगाळ
चाळीसगाव शहरापासून पूर्वेला अवघ्या दहा कि.मी. अंतरावर असणाऱ्या बाणगावात गावाला स्पर्श करून वाहणाऱ्या डोंगरी नदीला आलेल्या पुराने मोठे नुकसान केले. एकनाथ गणपण देवरे, वसंत भीमराव देवरे, लक्ष्मण सुपडू देवरे, राजू देवचंद पवार, भिकन देवचंद पवार, रमेश बुधा गायकवाड, सुरेश बुधा गायकवाड, हिरामण माणिक गायकवाड यांची घरे आणि संसारही वाहून गेले आहेत. घरांच्या जागी आता फक्त चिखलगाळ उरला आहे. अरुण रंगराव देवरे यांचे शेड वाहून गेले. अनिल दशरथ कुंभार यांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. समाजमंदिरही जमीनदोस्त झाले आहे.
-ज्यांची घरे वाहून गेली, ते सर्व मोलमजुरी करणारे नागरिक असून, काहींनी ग्रामपंचायतींत आसरा घेतला आहे.
-शेळी, गायी, म्हशी, बैल अशा दीडशे जनावरांना पुराच्या पाण्यात जलसमाधी मिळाल्याचे सांगताना पशुपालक, शेतकरी गलबलून जातात. दुभती जनावरेही पुराने हिरावून नेली आहेत.
चौकट
जलसंपदा मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत नाराजीचा सूर
शनिवारी जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. मात्र, पूरग्रस्तांसाठी कोणतीही तातडीची मदत जाहीर केली नाही. त्यांनी एकप्रकारे पूरग्रस्तांच्या तोंडाला पानेच पुसली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
सांगा उघड्यावर जगायचे कसे?
३१ ऑगस्टची ती रात्र मृत्यूचे तांडवच करीत होती. बरोबर तीन वाजता डोंगरी नदीचे पाणी वाढले. काही मिनिटांत घरात दरवाज्यापर्यंत पाणी भरले. कशीबशी आम्ही आमची सुटका करून जीव वाचविला. काही क्षणात घर कोसळले आणि सर्व वाहून गेले. मायबाप सरकारने तातडीने मदत करावी.
-एकनाथ गणपत देवरे, पूरग्रस्त, बाणगाव, ता. चाळीसगाव
050921\05jal_3_05092021_12.jpg~050921\05jal_4_05092021_12.jpg
बाणगाव येथे डोंगरी नदी लगत असणारी आठ घरे वाहून गेल्याने चिखळगाळ तेवढा उरला आहे. (छाया : जिजाबराव वाघ)~बाणगाव येथे डोंगरी नदी लगत असणारी आठ घरे वाहून गेल्याने चिखळगाळ तेवढा उरला आहे. (छाया : जिजाबराव वाघ)