तुला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:40+5:302021-08-24T04:20:40+5:30
सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात ...

तुला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची मागील वर्षातील गुण तसेच सुरू असलेल्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन याद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. यामुळे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. काहींना अधिक मार्क पडल्यामुळे तुला माझ्यापेक्षा जास्त मार्क कसे, असा प्रश्न ते एकमेकांना विचारत आहेत.
पालक काय म्हणतात...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. कमी गुण मिळू नये यासाठी विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी करून कसून अभ्यास केला होता; परंतु परीक्षा रद्द झाल्यामुळे त्यांचा विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. आताही चांगले गुण मिळाले आहे.
- आनंद देशमुख, पालक
.............
परीक्षा न घेण्याच्या पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. हुशार विद्यार्थ्यांवर यंदा निकालाचा परिणाम झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला त्यांना कमी आणि ज्यांनी अभ्यास केला नाही अशांना अधिक मार्क मिळाले आहेत. दरम्यान, आता चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धा असणार आहे.
- रामचंद्र पाटील, पालक
...................
विद्यार्थी काय म्हणतात...
वर्ग ऑनलाइनच होते. त्यामुळे वेळ भरपूर असल्यामुळे अभ्यासाकडे अधिक लक्ष दिले. परीक्षा होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती रद्द झाली. मागील वर्गात चांगले गुण होते. त्यामुळे मूल्यमापन पद्धतीनुसार यंदाही चांगले गुण मिळाले आहेत; परंतु ज्यांना जादा गुणांची अपेक्षा नव्हती. त्यांनाही चांगले गुण मिळाले आहेत.
- पल्लवी जाधव, विद्यार्थिनी
०००००००००००
यंदा सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी आता खरी अडचण आहे. नुकताच अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरला आहे. मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.
- मुकेश कोल्हे, विद्यार्थी
...........
परीक्षा नाही, मूल्यांकन नाही
-सन २०२०-२१ व त्यानंतर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे काही विद्यार्थी गुणांकनाबाबत असमाधान आहे.
- परीक्षा न घेताच गुणदान केले व पुनर्मूल्यांकनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही.
..................
मी त्याच्यापेक्षा हुशार आहे. मग त्याला माझ्यापेक्षा गुण अधिक कसे?
-अभ्यास करूनही मला कमी मार्क मिळाले. मात्र, तुला जास्त गुण कसे मिळाले, असा सवाल वर्गमित्र एकमेकांना करीत आहेत.
- बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरत आहे. त्यासाठी विद्यार्थी १२ वीला कसून अभ्यास करतात. त्याशिवाय ज्या अभ्यासक्रमाची ते निवड करणार आहेत, त्याची तयारी सुरू असते.
-यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पास करण्यात आले आहे. कुणाला कमी तर कुणाला जास्त मार्क मिळाले आहेत, अशा वेळी हुशार विद्यार्थी माझ्यापेक्षा तुला जास्त मार्क कसे मिळाले, असा प्रश्न विचारतात.
.........
एकूण विद्यार्थी संख्या
दहावीचे विद्यार्थी-५८२७९
बारावीचे विद्यार्थी-४५३५७
....
पास झालेले विद्यार्थी
दहावी-५८२४९
बारावी- ४५१५०