उमेदवारांसोबत नेत्यांचा लागणार कस..
By Admin | Updated: October 6, 2014 10:50 IST2014-10-06T10:50:21+5:302014-10-06T10:50:21+5:30
अनुसूचित जातीसाठी राखीव व लक्षवेधी ठरलेल्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात सहा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह पाच अपक्ष उमेदवार भाग्य अजमावत असले तरी खरी लढत ही तिरंगीच होईल, असे सध्याचे चित्र आहे.

उमेदवारांसोबत नेत्यांचा लागणार कस..
>(भुसावळ मतदारसंघ)
पंढरीनाथ गवळी■ भुसावळ
अनुसूचित जातीसाठी राखीव व लक्षवेधी ठरलेल्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात सहा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह पाच अपक्ष उमेदवार भाग्य अजमावत असले तरी खरी लढत ही तिरंगीच होईल, असे सध्याचे चित्र आहे.
'आयाराम गयाराम'मुळे या मतदारसंघाची राज्यात चर्चा झाली. असे असले तरी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे आणि भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे. उमेदवारांपेक्षा या दोन दिग्गजांमध्येच ही लढत होणार, असे मानले जात आहे.
भाजपा नेते खडसे यांच्यामुळे भाजपात दाखल झालेले विद्यमान आमदार संजय सावकारे व नाही नाही म्हणत शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीत आलेले अँड.राजेश झाल्टे. सावकारे यांच्यासाठी खडसे व अँड.झाल्टे यांच्यासाठी चौधरी कोणती रणनीती आखतात हे पाहणे मोठे औत्सुक्याचे राहणार आहे.
सावकारे यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे उघडून त्यांना आतमध्ये घेतल्याने उमेदवारीसाठी आधीपासून रांगेत असलेल्या भाजपातील अनुसूचित जातींच्या इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उमेदवार कोण आहे हे न पाहता केवळ कमळ पाहून मतदान करणार्यांनादेखील हा निर्णय आवडला नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
वरणगाव परिसर
मतदारसंघातील निर्णायक भाग असलेल्या वरणगाववर सर्वच पक्षांची मदार आहे. या भागातील मतदान निर्णायक ठरणार आहे.
शिवसेना सोडणारच नाही, असे सांगणारे अँड.राजेश झाल्टे यांनी उमेदवारी निश्चित होताच राष्ट्रवादी काँग्रेसचा पट्टा गळ्यात अडकवून शिवसेनेला दूर केले. त्यामुळे त्यांच्याबाबतीतही सावकारेंसारेखीच चर्चा आहे. त्यामुळे या दोघा उमेदवारांच्या विजयासाठी खडसे-चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागणार, असे सध्याचे या मतदारसंघातील राजकीय चित्र आहे.
संतोष चौधरी यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे की, माझा सामना हा खडसेंसोबत आहे, कोणा किड्या-मकोड्यांसोबत नाही. दोन वर्षांपूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे भुसावळचा नगराध्यक्ष मुस्लीम समाजाचा राहील. त्यानुसार अख्तर पिंजारी यांना मानाचे नगराध्यक्षपद मिळाले. त्यानंतर भुसावळचा आमदार बौद्ध समाजाचा असेल असे चौधरी यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांनी राजकीय पत्ते फेकले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अत्यंत कडवी झुंज राहील. दुसरे असे की, खडसे हे भुसावळसाठी किती वेळ देतात यावरही सावकारे यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
शिवसेनेचे उमेदवार संजय ब्राह्मणे या मतदारसंघात नवखे असले, तरी माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा, मनोज बियाणी यासारख्या स्थानिक शिवसेना पदाधिकार्यांच्या बळावर त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या उमेदवारीमुळेही स्थानिक इच्छुकांवर अन्याय झाल्याची भावना ही आहेच. केवळ पक्षाची शिस्त म्हणून कोणीही बोलत नसल्याची स्थिती आहे. दुसरे असे की, ब्राह्मणे हे भुसावळचे जावई आणि तेही लेवा पाटीदार समाजाचे. त्यामुळे या समाजाच्या मतदारांवर त्यांनी हक्क सांगितला आहे.
सुरुवातीपासून पीपल्स रिप. पार्टीच्या माध्यमातून संतोष चौधरी यांची साथसंगत करणारे. ते सांगतील तसे वागणारे अशी ओळख असलेले जगन सोनवणे यांच्या पत्नी माजी पं.स. सदस्या पुष्पा सोनवणे यांना पीआरपी (कवाडे) काँग्रेसचा सहयोगी पक्ष म्हणून काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्यातील स्नेहाच्या संबंधातून सोनवणे यांची वर्णी लागली आहे. तसे पाहिले तर या पक्षाची भुसावळ मतदारसंघात म्हणावी तशी ताकद नाही. एकही नगरसेवक नाही. बाजार समिती, पंचायत समिती यापैकी कोठेही सत्ता नाही. त्यामुळे सोनवणे यांना कठोर परिश्रम करावे लागणार हे निश्चित. मनसेचे रामदास सावकारे, बसपाच्या अँड.वंदना वाघचौरे, भारिप बहुजन महासंघाचे विनोद सोनवणे या निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. सोनवणे यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली. त्यामुळे वातावरणनिर्मिती झाली आहे. मनसेचे रामदास सावकारे हेदेखील जगन सोनवणे यांच्याप्रमाणे संतोष चौधरी यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे पुढे काय रणनीती ठरते हे पाहावे लागेल. अशोक शिरसाठ, जितेंद्र चांगरे, जगदीश भालेराव आणि गोकूळ बाविस्कर हे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतविभागणीचा फटका कोणाला ?
■ २00९ मध्ये १६ उमेदवार रिंगणात होते. या वेळी ११ आहेत. त्यात अँड.झाल्टेंसह सात उमेदवार एकाच समाजाचे आहेत. संजय सावकारे व रामदास सावकारेदेखील एकाच समाजाचे आहेत. त्यामुळे मतविभागणी होईल. त्याचा नेमका फायदा कोणाला आणि कसा होईल याची चर्चा आहे. शिवाय निवडणूक जशी जवळ येईल त्या वेळी काही वेगळी खेळी होण्याची शक्यता आहे.
■ अँड.झाल्टे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या शुभारंभाची सभा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुसावळात घेतली. पक्ष आणि पदाचा सामान्यांसाठी वापर न करता स्वत:साठी तिचा वापर केला. संसार एकासोबत व मंगळसूत्र दुसर्याचे अशांबाबत वेगळा विचार करण्याचे आवाहन त्यांनी सावकारे यांचा उल्लेख टाळून केला होता.