महामार्गावरून शहरातील रस्त्यांवर उतरणार तरी कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:19+5:302021-09-17T04:20:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खोटेनगर ते कालिकामाता मंदिर चौक या रस्त्यात महामार्गावरून शहरातील इतर रस्त्यांना जोडणारे ३१ जंक्शन ...

महामार्गावरून शहरातील रस्त्यांवर उतरणार तरी कसे?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खोटेनगर ते कालिकामाता मंदिर चौक या रस्त्यात महामार्गावरून शहरातील इतर रस्त्यांना जोडणारे ३१ जंक्शन तयार केले जात आहेत. त्यात २६ जंक्शन हे लहान आहेत, तर पाच जंक्शन हे मोठे आहेत. मात्र यातील बहुतांश जंक्शनची कामे अपूर्णच आहेत. त्यामुळे नागरिकांना महामार्गावरून उतरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्ग आणि शहरातील रस्त्यांना जोडणारे जंक्शन अजून तयार नाही. त्यातच पावसामुळे या ठिकाणी चिखल होतो. पाणी साचते, यामुळे अपघाताचा धोकादेखील आहे. त्याकडे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे.
जळगाव शहरातून जाणारा ७ किमीचा महामार्ग सध्या जळगावकरांसाठी डोकेदुखी बनला आहे. हे चौपदरीकरण शाप वाटावे, एवढ्या समस्या त्यात उभ्या राहत आहेत. महामार्ग तयार होत असला तरी अद्याप महामार्गावरून खाली उतरून शहरातील रस्त्यांना जोडणारे रस्ते तयार झालेले नाही. शहरात आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली, शिव कॉलनी, प्रभात चौक अशी मोठी जंक्शन्स आहेत. त्याशिवाय इतर २६ ठिकाणी लहान जंक्शन आहेत. मात्र त्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महामार्गावरून घराकडे जाताना नागरिकांना जपून वाहन चालवावे लागते. आधीच सर्व्हिस रोड नाहीत, त्यात पथदिवे बंद त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेकजण या लहान जंक्शन्सवरून घसरून पडतात. खोटेनगर, शिव कॉलनी यासोबतच अनेक ठिकाणी असे अपघात होत असतात.
सर्व्हिस रोडवर पडले मोठमोठे खड्डे
शहरात गुजराल पेट्रोलपंप आणि दादावाडी येथे अंडरपास तयार करण्यात आले आहेत. तेथे या अंडरपासमध्ये पाणी साचण्याची समस्या आहे. सोबतच आता नव्याने तयार करण्यात आलेल्या या सर्व्हिस रोडवर महिनाभरातच मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना तेथून वाहन नेताना कसरत करावी लागत आहे. या कामात करावे लागणारे सर्वात वरच्या स्तरातील डांबरीकरण न केल्याने ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे हा संपूर्ण सर्व्हिस रोड पुन्हा करावा लागणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.