घरे वाहून गेली, चूल विझली... होत्याचे नव्हते झाले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:54+5:302021-09-02T04:36:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : काल - परवापर्यंत असणारा डोक्यावरच्या घराचा आधारच मंगळवारी आलेल्या पुरात वाहून गेल्याने आम्ही पुरते ...

The houses were swept away, the stove went out ... it didn't happen! | घरे वाहून गेली, चूल विझली... होत्याचे नव्हते झाले !

घरे वाहून गेली, चूल विझली... होत्याचे नव्हते झाले !

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : काल - परवापर्यंत असणारा डोक्यावरच्या घराचा आधारच मंगळवारी आलेल्या पुरात वाहून गेल्याने आम्ही पुरते उघड्यावर पडलो आहोत. काही तासात असे होत्याचे नव्हते झाले. खेर्डे गावातील रघुनाथ महारु पाटील, अशोक महारु पाटील या दोघा भावांनी आपल्यावर गुदरलेली आपबिती कथन केली. पूर ओसरल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातून मात्र अश्रूंचा पूर वाहात होता.

‘लोकमत’ने पुराची मोठी झळ बसलेल्या खेर्डे गावातील स्थिती जाणून घेतली.

चाळीसगाव शहरापासून दक्षिणेला दहा किमी अंतरावर असणाऱ्या खेर्डे गावाला कन्नड तालुक्यातील भिलदरी केटीवेअरमधून आलेल्या पाण्याने मंगळवारी मध्यरात्री जणू वेढाच दिला. अतिवृष्टी सुरु असतानाच पुराच्या पाण्याचाही वेग प्रचंड असल्याने अडीचशे उंबऱ्यांचे हे गाव काही तासातच जलमय झाले. गाव आणि खेर्डे तांडा मिळून चार हजार लोकसंख्येचे हे गाव नैसर्गिक प्रकोपाने हादरून गेले आहे.

बुधवारी पूर ओसरल्यानंतर आपली वाहून गेलेली, पडझड झालेली घरे आणि उद्ध्वस्त झालेली शेती पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रूंच्या धारा वाहात आहेत. आभाळातून पडणारा पाऊस आता थांबला असला तरी, पुराने नागवे झालेल्या नागरिकांच्या डोळ्यातील पाऊस मात्र थांबायला तयार नाही. एवढे मोठे नुकसान झाल्यानंतरही प्रशासनाची कोणतीही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

आप्पा अहिरे, संजय पाटील, नाना सोनवणे, बापू महारु पाटील यांची घरे व संसारपयोगी सामानासह गुरेही पुरात वाहून गेली आहेत.

चौकट

शेतांमध्ये पाणी, काहींची शेतीच गेली वाहून

पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने येथे मका, सोयाबीन, कपाशी व कडधान्ये पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेकडो हेक्टरवरील पिके बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.

१...कैलास सुदाम पाटील या शेतकऱ्याचे तीन एकर शेतच वाहून गेले असून, काल - परवापर्यंत शेतात डोलणारे कपाशीचे पीक मंगळवारी आलेल्या पुरात मातीसह वाहून गेले. शेतात आता फक्त दगड - धोंडे दिसत आहेत.

२...गावात पशुधनाचीही मोठी हानी झाली असून, दुभत्या जनावरांसह दीडशे गुरे पुराच्या पाण्यात मृत्युमुखी पडली आहेत.

चौकट

शाळेचे रेकॉर्डही पुरात स्वाहा

गावात माती व पत्र्याची घरे आहेत. यातील काही घरांच्या भिंती खचल्याने पत्रे खाली येऊन पडले, तर १२ ते १५ घरांची पडझड झाली आहे. शाळेची भिंत वाहून गेल्याने शालेय रेकॉर्डला जलसमाधी मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

२..गावालगत असणारी महिलांची शौचालयेही वाहून गेली असून, जागेवर फक्त माती आणि विटा उरल्या आहेत.

३...खेर्डे गाव व तांड्याला जोडणाऱ्या पुलालाही मोठे भगदाड पडल्याने संपर्क तुटला आहे.

चौकट

डॉ. सुनील राजपूत धावले मदतीला

चाळीसगाव येथील कळंत्री प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत यांनी पदरझळ सोसून गावातील ८० कुटुंबांना बुधवारी सकाळी ९ वाजता किराणा सामानाचे वाटप केले. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना डॉ. राजपूत मदतीला धावून आल्याने गावकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यावेळी सरपंच पोपट पाटील, माजी सरपंच दीपक पाटील, रांजणगावचे माजी सरपंच जिभाऊ आधार पाटील, आर. डी. चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: The houses were swept away, the stove went out ... it didn't happen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.