हॉटेल फोडले, २५ हजारांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:39+5:302021-09-03T04:18:39+5:30
फैजपूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून लहानमोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच १ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मुख्य सुभाष ...

हॉटेल फोडले, २५ हजारांची रोकड लंपास
फैजपूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून लहानमोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच १ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मुख्य सुभाष चौकातील धनजी शेठ रेस्टॉरंट फोडून २५ हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
शहरातील मुख्य सुभाष चौक तसेच रहदारीच्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर असलेल्या धनजी शेठ हॉटेलच्या मुख्य शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी हॉटेलच्या काउंटरमधील २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.
चोरट्यांनी अतिशय निवांतपणे चोरी केल्याचे दिसत आहे. हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर सुट्टे पैसे लागत असल्याने बुधवारी १५ हजार रुपयांची दहा रुपयांची बंडले आणून ठेवली होती. बुधवारी रात्री जोरदार पाऊस असल्याने हॉटेल चालक यांनी घरी कॅश नेण्याचे टाळले होते व तीच कॅश व अन्य ५०च्या नोटांचे बंडल चोरट्यांनी लांबविले. या चोरट्यांनी कुलुपे तोडण्यासाठी लोखंडी सळई व एक्सो पात्याचा वापर केला असल्याचे घटनास्थळावर पडलेल्या साहित्यावरून दिसते. तसेच चोरट्यांनी काही फाटलेल्या तसेच काही दहा रुपयांच्या नोटा या अकाउंटवर सोडून दिल्या होत्या. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर त्यांनी भेट देऊन माहिती घेतली.
दरम्यान, यापूर्वीही शहरातील बसस्थानक तसेच सुभाष चौकातील टपऱ्या फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्याची पोलिसात नोंद नाही.
कॅमेरे केवळ शोपीस !
शहरात वेगवेगळ्या भागात पालिका प्रशासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र हे कॅमेरे केवळ देखाव्यापुरते उरले आहेत. सुभाष चौकातील कॅमेरेसुद्धा बुधवारी सायंकाळी बंद पडले असल्याचे सांगण्यात आले व त्याच रात्री ही चोरीची घटना घडली. या घटनेप्रकरणी हॉटेल मालक भरत चौधरी यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तपास सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर व सहकारी करीत आहेत.
चोरट्यांनी काऊंटरवरच सोडून दिलेल्या काही दहा रुपयांच्या नोटा तसेच कुलुपे तोडण्यासाठी वापरलेली सळई व अन्य साहित्य. (छाया : वासुदेव सरोदे)