जळगाव : महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होताच, आता जळगावच्या गल्लीबोळांत प्रचाराचा धुरळा उड्डू लागला आहे. रविवारपासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रभागात प्रचाराचे नारळ फोडून रणशिंग फुंकले आहे. थंडीचा जोर ओसरताच आता नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी शहराचे राजकीय तापमान वाढण्यास मात्र सुरुवात झाली आहे.
महायुतीच्या प्रचाराची सुरुवात रविवारी सायंकाळी पिंप्राळ्यातील भवानी माता मंदिरातून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली.
वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांचे नियोजन
निवडणुकीत रंगत वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी दिली. याशिवाय मनसे, समाजवादी पक्ष आणि एमआयएमदेखील आपापल्या प्रभागांत प्रचाराचा जोर लावत आहेत. तसेच राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या सभांसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.
महाविकास आघाडीची 'रणनीती': स्थानिक नेत्यांवर मदार
उद्धव सेना: उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या सभांचे अद्याप नियोजन नसले तरी, सुषमा अंधारे आणि नितीन बानगुडे पाटील यांच्या तोफा शहरात धडाडणार आहेत. कोपरा सभांवर अधिक भर देत स्थानिक नेत्यांच्या खांद्यावर प्रचाराची पूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून तरुण नेते रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री एकनाथ खडसे मैदानात उतरणार आहेत.
प्रचाराचा धडका सुरू...
रविवारी सुटीचा दिवस साधत जवळ-जवळ सर्वच उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील कुलदैवत आणि मंदिरांमध्ये नारळ फोडून प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. रॅली, कॉर्नर सभा आणि घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या प्रचारामुळे शहरातील वातावरण आता पूर्णपणे निवडणूकमय झाल्याचे दिसत आहे.
महायुतीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा रोड शो..
भाजप: विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आयोजित केला आहे. त्यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
शिंदे सेना: पक्षाचे मुख्य नेते २ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही रोड शो होणार असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याही जाहीर सभांचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली.
राष्ट्रवादी (अजित पवार): राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडूनही स्थानिक नेत्यांच्या कॉर्नर सभांचे नियोजन असून, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सभा किंवा रोड शोचे नियोजन सुरु असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली.
Web Summary : Jalgaon gears up for municipal elections as parties launch campaigns. MahaYuti starts at a temple, while MahaVikas Aghadi focuses on local leaders. Key leaders like Fadnavis, Shinde, and Pawar are expected to rally.
Web Summary : जलगांव में नगर निगम चुनाव की तैयारी शुरू हो गई है क्योंकि पार्टियों ने प्रचार शुरू कर दिया है। महायुति की शुरुआत एक मंदिर से होती है, जबकि महाविकास अघाड़ी स्थानीय नेताओं पर ध्यान केंद्रित करती है। फडणवीस, शिंदे और पवार जैसे प्रमुख नेताओं से रैली करने की उम्मीद है।