‘त्या’ हार्डडिस्कमधून अनेकांची कुंडली बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:11+5:302021-09-02T04:38:11+5:30
जळगाव : बीएचआर घोटाळा प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या हार्डडिस्कमधून अनेक दिग्गजांची कुंडली बाहेर आलेली आहे. हार्डडिस्कमधील माहितीवर तीन विशेष ...

‘त्या’ हार्डडिस्कमधून अनेकांची कुंडली बाहेर
जळगाव : बीएचआर घोटाळा प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या हार्डडिस्कमधून अनेक दिग्गजांची कुंडली बाहेर आलेली आहे. हार्डडिस्कमधील माहितीवर तीन विशेष लेखापरीक्षक काम करीत असून, पुरावे संकलित करण्याचे काम केले जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ठेवीदारांच्या पावत्या कमी किमतीत विकत घेऊन त्या कर्जात समायोजित केल्याच्या प्रकरणात जिल्ह्यातील ११ कर्जदारांच्या अटकेनंतर आता आणखी ज्यांनी कर्जाची फेड केलेली नाही, असे बडे कर्जदार रडारवर असून, त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल व्यावसायिक भागवत गणपत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे प्रेम रामनारायण कोगटा, जयश्री शैलेश मणियार, माजी मंत्री गिरीश महाजन यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे जितेंद्र पाटील, छगन झाल्टे यांच्यासह ११ जणांना अटक झाली होती. या सर्वांनी जुलै महिन्यात २० टक्के रक्कम अर्थात ३ कोटी १३ लाख रुपये न्यायालयात भरली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी काही बडे कर्जदार असून, त्यात माजी लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. जिल्ह्यातील या बड्या लोकांनी नियम डावलून बीएचआरमधून कोटीच्या घरात कर्ज घेतल्याचा सीआयडीच्या फॉरेन्सिक फ्रॉड डिटेक्शन ऑडिट रिपोर्टमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. हार्डडिस्कमध्येही धक्कादायक माहिती मिळाली असून, त्यामुळेच अवसायकांना हार्डडिस्क मिळण्यास विलंब होत असल्याचेदेखील सांगितले जात आहे.
त्या २२ जणांचीही चौकशी होणार
बड्या कर्जदारांसोबतच ठेव पावत्या कमी किमतीत खरेदी करुन त्या बड्या कर्जदारांना देऊन त्यांचे कर्ज नील दाखविण्यात एजंट लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सेटलमेंट करणारे एजंटदेखील रडारवर असून, त्यांचा आकडा २६पेक्षा अधिक आहे. त्यामुळे बडे कर्जदार असलेले माजी लोकप्रतिनिधी यांच्यासोबतच या एजंटवरही अटकेची टांगती तलवार आहे. शालेय पोषण आहाराशी संबंधित २२ जणांची नावे पुढे आलेली आहेत, त्यांचीही चौकशी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य बडे मासे समजले जाणारे जितेंद्र कंडारे व सुनील झंवर हे दोन्ही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. सध्या ते पुण्याच्या येरवडा कारागृहात आहेत.
खोकले यांची बदली स्थगितीसाठी पत्र
बीएचआर प्रकरणाच्या तपासाधिकारी सुचेता खोकले यांची दहशतवादविरोधी पथकात बदली झालेली आहे. ही बदली स्थगिती अर्थात अंशत: बदल यासाठी पुणे पोलीस आयुक्तांकडूनच पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. उपायुक्त भाग्यश्री नवटके व निरीक्षक सुचेता खोकले यांच्यामुळेच ठेवीदारांना त्यांच्या घामाचा पैसा परत मिळाला आहे, म्हणून खोकले यांची बदली रद्दसाठी संघटनांनीही पाठपुरावा सुरू केला आहे.