गुणवंत विदयार्थी, उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:12+5:302021-09-04T04:20:12+5:30
जळगाव जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढीतर्फे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जी. एस. हायस्कूल येथे ...

गुणवंत विदयार्थी, उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार
जळगाव जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढीतर्फे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जी. एस. हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेला होता.
यावेळी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, देश सक्षम करायचा असेल तर जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण केली पाहिजे. सामान्य माणसाला हक्काची आर्थिक साहाय्य करणारी संस्था म्हणजे माध्यमिक पतपेढी होय. शासन थोडे शिक्षणातून अंग काढून घेत आहे, त्यासाठी आवाज उठवला पाहिजे.
आमदार अनिल पाटील यांनी बक्षीस वितरण म्हणजे मुलांना एक प्रकारची प्रेरणा असून, प्रगतीच्या दिशेने मुलांना नेण्याचा प्रयत्न असतो. पतपेढ्या डबघाईला जात असताना जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकांची पतपेढी आशिया खंडात सर्वात कमी दराने व्याज आकारणारी पतपेढी चांगल्या पद्धतीने सुरू आहे, याचे कौतुक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष शालिग्राम भिरुड यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली तसेच येणाऱ्या काळात सभासद शिक्षक व शिक्षकेतर पाल्यांसाठी वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमात गुणवंत पाल्यांना चांदीची पदके व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सभासद शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील, डॉ. अनिल शिंदे, खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र जैन, गं. स. हायस्कूलचे चेअरमन योगेश मुंदडे, पतपेढी संचालक पी. डी. पाटील सर, नंदू पाटील सर, गजानन गव्हारे सर, राजू चौधरी सर, जयवंतराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह स्थानिक संचालक, विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी, तालुक्यातील सभासद बांधव व गुणवंत पाल्ये उपस्थित होते. वसुंधरा लांडगे केले यांनी सूत्रसंचालन केले. संचालक आर. डी. चौधरी यांनी आभार मानले.