अपहरणाचा डाव हाणून पाडणाऱ्या जागरूक नागरिकाचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST2021-06-04T04:13:57+5:302021-06-04T04:13:57+5:30
अमळनेर : आपल्या सतर्कतेने दोन लहान मुलांचा अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडून आरोपी पोलिसात हजर करणाऱ्या सुरेश दाभोळे यांचे कौतुक ...

अपहरणाचा डाव हाणून पाडणाऱ्या जागरूक नागरिकाचा सत्कार
अमळनेर : आपल्या सतर्कतेने दोन लहान मुलांचा अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडून आरोपी पोलिसात हजर करणाऱ्या सुरेश दाभोळे यांचे कौतुक करून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सत्कार केला.
जळगाव येथील गोपालपुरामधून सुनील बारेला याने एक १० वर्षांची मुलगी व ९ वर्षांचा मुलगा यांचे अपहरण करून फरार झाला होता. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने जिल्हाभर पोलीस शोध घेत असताना सुनील बारेला त्या लहान मुलांना घेऊन मारवड रस्त्याला सकाळी पायी जात होता. सुरेश दाभोळे याला त्यांची दया आली आणि तुम्हाला कुठे जायचे सोडून देतो, असे सांगितले; मात्र बारेला याने ‘ही माझी मुले आहेत. मी काम शोधत फिरत आहे’, असे सांगितल्याने दाभोळे याला पुन्हा दया आली आणि त्याने तिघांना भोई वाड्यात म्हशींच्या एका तब्येल्यात आणून बारेलाला कामदेखील दिले; मात्र कामानिमित्त बारेला बाहेर जाताच त्याचे बिंग फुटले आणि मुलांनी रडत रडत अपहरण झाल्याचे सांगितले.
सुरेश दाभोळे याला ही घटना कळताच तितक्याच कठोरतेने त्याने ही घटना हेड कॉन्स्टेबल जनार्दन पाटील यांना कळवली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाने गोपनीयता बाळगून आरोपी सुनील बारेला आणि त्या मुलांना पोलीस स्टेशनला आणले. मुलांना पोलिसांच्या मदतीने आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले तर आरोपीला जेलची हवा मिळाली. सुरेश दाभोळे याच्या दयाळू वृत्ती आणि जागरूकता पाहून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी कौतुक करून त्याचा सत्कार केला.