चुंचाळ्यातील बैलजोडी चोरीप्रकरणी होमगार्डसह तीन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:46+5:302021-08-20T04:21:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यावल : तालुक्यातील चुंचाळे येथे २ ऑगस्ट रोजी चोरून नेलेल्या बैलजोडी चोरी प्रकरणातील तो अज्ञात ...

चुंचाळ्यातील बैलजोडी चोरीप्रकरणी होमगार्डसह तीन जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
यावल : तालुक्यातील चुंचाळे येथे २ ऑगस्ट रोजी चोरून नेलेल्या बैलजोडी चोरी प्रकरणातील तो अज्ञात चोरटा गावातीलच रहिवासी तथा होमगार्ड म्हणून सेवेत असलेला तरुण असल्याचे निष्पन्न झाल्यावरून त्या होमगार्ड तरुणांसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
चुंचाळे येथील शेतकरी अशोक साहेबराव धनगर यांची सात वर्ष वयाची २० हजार रूपये किमतीची बैलजोडी त्यांनी २ ऑगस्ट रोजी घराच्या बाहेर बांधली होती. मध्यरात्रीनंतर बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचे सकाळी निदर्शनास आले. त्याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी गावात घटनास्थळासह चुंचाळे गावातून अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गापर्यंत येणारे मार्ग यात बोराडे आणि किनगावकडील मार्गावर पाहणी केली. यात किनगाव बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चुंचाळे येथील रहिवासी तथा होमगार्ड दिनेश उर्फ दीपक बाळू पाटील हा एका वाहनाच्या पुढे दुचाकी घेऊन मध्यरात्रीनंतर दिसला. या वाहनात बैलजोडी असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. तेव्हापासून संशयिताच्या शोधार्थ पोलिसांचे पथक होते. मंगळवारी रात्री संशयित किनगाव भागात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयित आरोपी होमगार्ड दिनेश उर्फ दीपक बाळू पाटील रा. चुंचाळे तसेच त्याचे दोन साथीदार ऋषिकेश राजेंद्र पाटील (वय २३, रा. राजोरा, ता. यावल) व अरुण गोकूळ पाटील (वय ३५) रा.चांदणी कुऱ्हा, ता. अमळनेर यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बुधवारी या तिघांना येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधिश एम.एस. बनचरे यांच्यासमोर हजर केले असता तिघांना दिवसांची ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.
मुद्देमाल घेतला ताब्यात
या गुन्ह्यातील तीन संशयितासह गुन्ह्यात वापरलेली जीप (क्रमांक एमएच-०५ एचडी-४५३६), विनाक्रमांकाची दुचाकी व बैल जोडी असा एकूण दोन लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यापूर्वी संशयितांनी पशुधनाची कुठे चोरी केली आहे का याबाबत तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्ह्याचा उलगडा
किनगाव बुद्रूक ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगातून दोन लाख ५४ हजारांच्या निधीतून गावात १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. याच सीसी कॅमेऱ्यामध्ये चुंचाळे येथील चोरटा कैद झाला. या आधारे पोलिसांनी चोरट्याचा तपास लावला. शेतकऱ्यांचे पशुधन चोरी करणारा चोरटा गजाआड झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे सार्थकी झाल्याचे मत सरपंच निर्मला संजय पाटील यांनी व्यक्त केले.