सुक्या नदीवरील पुलाला पडले छिद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:04+5:302021-09-24T04:18:04+5:30
सावदा : खान्देशची जीवनरेखा म्हणून ओळख असलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील सावदा येथून जवळच असलेल्या सुक्या नदीवर असलेल्या पुलावर लहान-मोठी ...

सुक्या नदीवरील पुलाला पडले छिद्रे
सावदा : खान्देशची जीवनरेखा म्हणून ओळख असलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील सावदा येथून जवळच असलेल्या सुक्या नदीवर असलेल्या पुलावर लहान-मोठी छिद्रे; तसेच खड्डे पडले आहेत. यामुळे हा पूल अत्यंत धोकादायक बनला असून वाहनधारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाला असल्याने सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा प्रमुख म्हणून या महामार्गाची ओळख आहे. रावेर व बऱ्हाणपूर येथून भुसावळ, जळगाव व पुढे जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. या पुलावरून केळीने व अन्य सामग्रीने भरलेल्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. पुलाची अतिशय दुर्दशा झाली आहे. याकडे मात्र वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पुलाच्या दुरवस्थेमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुरूम टाकण्याचा प्रताप केला जात आहे. केळीने भरलेल्या ट्रक या ठिकाणाहून प्रवास करत असताना लहान-मोठे मुरुमाचे दगड उडत असतात. त्यामुळे प्रवाशांना इजा होण्याची शक्यता आहे. पुलावर पडलेल्या छिद्रांचे रूपांतर मोठ्या भगदाडात झाल्यावर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडतील का? असा संतप्त सवाल, आता परिसरातील नागरिक विचारू लागले आहेत.
पुलावर गवत व माती
या पुलावर दुतर्फा माती गोळा झाली असून, पावसाळ्यात या मातीवर मोठ्या प्रमाणात गवतही उगले आहे. पुलावर दुतर्फा माती साचल्याने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळेच पुलावर मोठ-मोठे खड्डे पडत असतात.
केळीमुळे मोठी वाहतूक
रावेर तालुक्यातील सावदा शहराला केळीमुळे संपूर्ण देशात ओळख असून, तालुक्याच्या पूर्व भागातील व शेजारील मध्य प्रदेश राज्यात केळी निर्यातीसाठी शहरातून नेली जात असते. या पुलावरून केळीची शेकडो अवजड वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी देखील या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
काही वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल खचल्याने मोठी जीवितहानी झाली होती. या पुलाकडे देखील दुर्लक्ष केल्यास सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे.