वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : भारताच्या ग्रामीण भागात काँग्रेसला रुजविण्यात मोठा वाटा असलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील फैजपूर येथे १९३६ साली भरलेल्या काँग्रेसच्या पहिल्या ऐतिहासिक ग्रामीण अधिवेशनाच्या स्मृती जागृत करणारे संकल्पचित्र ७० लाख रुपये खर्च करून फैजपूर पालिकेने उभारले आहे. मात्र या संकल्प चित्राला अतिक्रमणाचा विळखा तर होताच आता गाजर गवताचाही विळखा पडला आहे.२७, २८ व २९ डिसेंबर १९३६ दरम्यान हे अधिवेशन झाले होते. आज त्याचा स्मृती जागृत करणारा दिवस आहे. मात्र फैजपूर पालिकेला या संकल्प चित्राची साधी साफसफाई करण्याचाही विसर पडला आहे.शहरातील छत्री चौकात हे भव्य दिव्य संकल्पचित्र पालिकेने उभारले आहे. भावी तरुण पिढीला प्रेरणा देणारे व शहराच्या सौंदर्यात भर पाडणारे हे संकल्प चित्र ठरेल, असे वाटत असताना या संकल्प चित्राकडे पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांचे एकत्र पुतळे असलेले एकमेव हे एकमेव संकल्प चित्र असावे.१९३६ मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनामुळे फैजपूर शहराचे नाव जगाच्या नकाशावर झळकले होते. त्याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने हे संकल्प चित्र तयार तयार केले आहे. या अधिवेशनाचे आयोजक स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी होते. या अधिवेशनाला म.गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, डॉ.राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, अब्दुल गफारखान ऊर्फ सरहद्द गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, साने गुरुजी यांची उपस्थिती होती. यातील काही महापुरुषांचे अर्धाकृती पुतळे एकाच भिंतीवर लावण्यात आलेले आहे तर एका बैलगाडीवर पंडित नेहरू अधिवेशनाला जात असताना त्यांचा पूर्णाकृृती पुतळा बैलगाडीवर आहे व या बैलगाडीचे सारथी शंकर देव असल्याचा देखावा दाखवण्यात आला आहे. यात १२ पूर्णाकृती पुतळे लावण्यात आले आहेत.अतिशय देखणे हे संकल्प चित्र तयार करण्यात आले आहे. मात्र या संकल्पचित्राची पुढील देखरेख करण्यासाठी पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. संकल्प चित्राच्या दर्शनी भागावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. आतून संकल्पचित्राच्या अवती-भवती गवत व काटेरी झुडपे वाढलेली आहे तर पुतळ्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचली आहे. तसेच लाखो रुपये खर्च करून लाईटची व्यवस्था करण्यात आलेली असल्यावरसुद्धा हे लाईट आता बंद अवस्थेत आहेत. कमीतकमी पालिका प्रशासनाने या अधिवेशनाच्या स्मृतिदिनी तरी या संकल्प चित्राची साफसफाई करून कायमस्वरूपी निगा राखावी, अशी अपेक्षा शहरवासीयांमधून होत आहे
ऐतिहासिक फैजपूर अधिवेशन संकल्प चित्राला काटेरी झुडपासह अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 19:35 IST
फैजपूर येथे १९३६ साली भरलेल्या काँग्रेसच्या पहिल्या ऐतिहासिक ग्रामीण अधिवेशनाच्या स्मृती जागृत करणारे संकल्पचित्र पालिकेने उभारले आहे. मात्र या संकल्प चित्राला अतिक्रमणाचा विळखा तर होताच आता गाजर गवताचाही विळखा पडला आहे.
ऐतिहासिक फैजपूर अधिवेशन संकल्प चित्राला काटेरी झुडपासह अतिक्रमणाचा विळखा
ठळक मुद्देस्मृती जागृत करण्याच्या दिवशीही पालिकेला विस्मृतीफैजपूर पालिकेने वेळीच उपाययोजना करण्याची गरज