ज्येष्ठ नागरिकांना सहायता दूतांचा मदतीचा हात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:27+5:302021-09-23T04:18:27+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सामाजिक बांधीलकीच्या नात्याने ज्येष्ठ नागरिकांना सहायता करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या दूतांकरवी समाजातील ...

Helping hand for senior citizens! | ज्येष्ठ नागरिकांना सहायता दूतांचा मदतीचा हात !

ज्येष्ठ नागरिकांना सहायता दूतांचा मदतीचा हात !

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सामाजिक बांधीलकीच्या नात्याने ज्येष्ठ नागरिकांना सहायता करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या दूतांकरवी समाजातील ज्येष्ठांना मदतीचा हात मिळू लागला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत तीन जिल्ह्यांतील ५० विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक सहायता दूत म्हणून ऑगस्ट महिन्यात प्रशिक्षित करण्यात आले. बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिक हे एकटे राहतात. त्यांच्या आरोग्यविषयक व इतर अनेक समस्या निर्माण होतात. त्यांना मदत करण्यासाठी या विभागाने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत ही कल्पना मांडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. या प्रशिक्षणाचा आता फायदा दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत चार घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना या सहायता दूतांनी मदत केली. दरम्यान, प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार, प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर, प्रभारी संचालक डॉ. मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सहायता दूत नागरिकांच्या मदतीला धावून जात आहेत. आजीवन अध्यापन विभागातील सुभाष पवार, महेश जडे, समाधान अहिरे हे सहायता दूतांना सहकार्य करीत आहेत.

... अशी मिळतेय मदत !

- रावेर तालुक्यातील रोझोदा येथील ७५ वर्षीय विमलबाई झाल्टे या उपचारासाठी दवाखान्यात गेल्या होत्या. परताना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या. इतर कुणी सहकार्य करण्याच्या तयारीत नसताना मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वप्नील हिवरे याने धाव घेत त्यांना धीर दिला व घरी सुखरूप पोहोचते केले आणि आता तो या आजींच्या घरी वेळोवेळी जाऊन काळजी घेत आहे.

- अमळनेर येथील पंडित जवाहरलाल समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी सुप्रीम पाटील हा अमळनेर येथील आत्माराम पाटील या ज्येष्ठ नागरिकाच्या बँक, वैद्यकीय, प्रवास व घरगुती कामात वेळोवेळी सहकार्य करीत आहे.

- चोपड्यातील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी यश जगताप याने मांडळ या गावात ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून टाकाऊ वस्तूंपासून दोन बाक तयार करून दिले आहेत.

- विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचा विद्यार्थी भूषण महाजन यानेही एका वृद्ध महिलेला सहकार्य करून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Helping hand for senior citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.