जळगाव : डॉक्टर असलेल्या पतीपासून सातत्याने होत असलेल्या छळाला कंटाळून राहत्या घरातच पंख्याला दोरी बांधून आत्महत्या करायला निघालेल्या विजयालक्ष्मी भरत सोनवणे (५०) या महिलेला एमआयडीसी पोलिसांमुळे जीवदान मिळाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री आयोध्या नगरात घडली. विजयालक्ष्मी यांना माहेरच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आयोध्या नगरातील श्री अपार्टमेंटमध्ये डॉ.भरत सोनवणे, पत्नी विजयालक्ष्मी, मुलगा सचिन, सून वैशाली असे कुटुंबासह वास्तव्याला आहेत. डॉक्टर व पत्नी यांच्यात अनेक दिवसापासून वाद आहेत. बुधवारी रात्री देखील हा वाद उफाळून आला. त्या संतापात विजयालक्ष्मी या एका खोलीत गेल्या व जाण्यापूर्वी मी आता आत्महत्या करते, तुला दाखवतेच असे म्हणून दरवाजा बंद केला. आतून त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फोन करुन स्वत:चे नाव व पती डॉक्टर असल्याचे सांगितले माझ्या पतीपासून मला खूप त्रास आहे. त्यांनी खूप छळ केला आहे, त्यामुळे मी आत्महत्या करीत असून माझ्या पतीला सोडू नका असे सांगून फोन बंद केला. ठाणे अमलदार विजय पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी रात्रीच्या गस्तीला असलेले उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांना तातडीने घटनास्थळावर रवाना केले. महिलेने फक्त नाव सांगितले होते, पत्ता सांगितला नव्हता, त्यामुळे ही एक अडचण झाली. महिलेचे नाव ऐकून रामकृष्ण पाटील यांना दोन वर्षापूर्वी याच नावाची महिला आपल्याकडे आली होती व तिचा तक्रार अर्ज अजूनही पोलीस ठाण्यातच असल्याने ही महीला तीच असावी म्हणून अंदाजे थेट तीचे घर गाठले.
घरात आरडाओरड
पोलिसांचे पथक घरी गेल्यावर तेथे प्रचंड आरडाओरड सुरु होती. पोलीस महिलेला बाहेरुन आवाज देत होते, मात्र ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. माझ्या पतीने मला खूप छळले आहे, त्याला सोडू नका इतकेच ती सांगायची. दरवाजा तोडण्याशिवाय पर्यायच नसल्याने पोलिसांनी शेवटी लोखंडी सळई व इतर साहित्याने दरवाजा तोडला असता आतमध्ये विजयालक्ष्मी या पंख्याच्या दोरीला गळफास घेण्याच्या तयारीतच होत्या. थोडा उशीर झाला असता तर त्यांनी आत्महत्या केली असती. रात्रीच्या रात्री महिलेचा भाऊ नितीन काशिनाथ केदार, वहिनी उज्ज्वला व नातेवाईक विवेक ठाकूर यांना भुसावळातून बोलावण्यात आले. कुटुंबाची समजूत घालून विजयालक्ष्मी यांना माहेरी पाठविण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्याच्या दप्तरी नोंद घेण्यात आली आहे.