अतिवृष्टीने नांदगावमधील पेटत्या चुली विझल्या, अन्नदात्या शेतकऱ्यावरच उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:34+5:302021-09-12T04:20:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सायगाव, ता. चाळीसगाव : सायगाव आणि संपूर्ण गिरणा व मन्याड परिसरात हातातोंडाशी आलेला घास वरुणराजाने ...

Heavy rains turn off stoves in Nandgaon | अतिवृष्टीने नांदगावमधील पेटत्या चुली विझल्या, अन्नदात्या शेतकऱ्यावरच उपासमारीची वेळ

अतिवृष्टीने नांदगावमधील पेटत्या चुली विझल्या, अन्नदात्या शेतकऱ्यावरच उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क

सायगाव, ता. चाळीसगाव : सायगाव आणि संपूर्ण गिरणा व मन्याड परिसरात हातातोंडाशी आलेला घास वरुणराजाने हिरावून नेला. आज अनेक शेतकरी संसार उघड्यावर आल्याने उपाशी आहेत, तर अनेकांच्या घरी पुरानंतर चूलही पेटलेली नाही. खायचं काय? असा प्रश्न या जगाच्या पोशिंद्याला पडला आहे. विशेष म्हणजे कपाशी अतिवृष्टीने गिळंकृत केल्यानंतर शासनाने या पिकाला हमीभाव दिला आहे.

आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की, संपूर्ण शेतीचा खर्चदेखील निघणार नाही आणि आज शासन कपाशीला जास्तीचा भाव देत आहे. म्हणजे शासनाने शेतकऱ्यांची अवहेलनाच केली अशी प्रतिक्रिया पूरग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे. ज्या वेळेस शेतकऱ्यांजवळ भरमसाठ कापूस राहतो, त्यावेळीस शासन शेतीमालाला चांगला भाव देत नाही आणि आज कापसाचे उत्पन्न कमी आहे तर जास्त भाव दिला गेल्याचे.

तेल गेले आणि तुपाला काय महत्त्व?

सायगाव परिसरच नव्हे तर आज संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात पावसाच्या जोरदार आगमनाने शेतकऱ्यांचे कधी नव्हे एवढे मोठे नुकसान झाले आहे. कोणाची कपाशी, कोणाचा ऊस व कोणाची इतर पिके रोगराईच्या कचाट्यात व पाण्याच्या धडाक्याने पूर्णत: नेस्तानाबूत झाली आहेत. नुकसानीने आज प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येत आहेत आणि कपाशीला भाव म्हणजे शासन आज शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, अशी चर्चा शेतकरी आपापसांत करत आहेत. म्हणजे आज शेतकऱ्याजवळ माल नाही तर भाव आणि शेतकऱ्याजवळ माल राहिला तर भाव एकदम खाली, असा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांना तेल गेले आणि तुपाला काय महत्त्व? असाच झाला आहे.

शेतकऱ्यांना मदतीच्या हाताची गरज

सलग चार ते पाच दिवस वरुणराजा बरसला आणि शेतकऱ्यांचे सर्वांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खासकरून सायगाव येथून जवळ असलेल्या नांद्रे गावाला एवढा मोठा तडाखा बसला आहे. कधी नव्हे एवढा मोठा धक्का बसला आहे. शेतीच्या शेती पूर्णत: पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. आज लाखोच्या घरात येणारी पिके नसल्याने त्यांच्या हातात एक छदाम पैसा येणार नाही. आमदार मंगेश चव्हाण एक दिवसाच्या दौऱ्यावर आल्यानंतर गावाकडे फिरकलेच नाही, असे तेथील लोकांनी सांगितले. आज नांद्रे येथे जाण्यासाठी पूल सोडला तर रस्तादेखील नाही आहे.

नांद्रेला शासनाची काहीच मदत नाही

सायगाव येथून जवळ असलेल्या नांद्रे गावाला जोरदार पावसाचा व पुराचा तडाखा बसला असल्याने नांद्रे गाव होरपळून निघाले आहे. आज गोरगरीब हातावर मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांना खायलादेखील अन्न नाही, अशा परिस्थितीत आपले नांद्रे गाव पूर्वपदावर आणण्यासाठी नांद्रे येथील उपसरपंच किरण पाटील यांनी स्वत:च्या खर्चाने खिचडी खाऊ घातली व तलाठी गणेश गढरी, मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, कोतवाल सागर पाटील, उपसरपंच किरण पाटील, पोलीस पाटील नितीन निकम, सदस्य दीपक गांगुर्डे हे परोपरीने मदत करत आहेत. तहसीलदार अमोल मोरे, पुरवठा अधिकारी रणजित पाटील, रेशन दुकानदार संदीप पाटील यांनी तात्काळ मोफत रेशन वाटप केले आहे. किरण पाटील अहोरात्र झटून गावातील ग्रामस्थांच्या मदतीला धावून गेले आहेत.

आज नांद्रे गावांची परिस्थिती इतकी भयानक आहे की, गोरगरिबांना खायला अन्न नाही. गुराढोरांना चारा नाही. गावाला जाण्यायेण्यासाठी रस्ता नाही. फक्त पंचनामे पूर्ण केले आहेत. तरी गावाला तात्काळ मदत देण्यात यावी.

-किरण पाटील, उपसरपंच, नांद्रे

Web Title: Heavy rains turn off stoves in Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.