जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:15+5:302021-09-08T04:22:15+5:30
इशारा : हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले जळगाव : खान्देशात मंगळवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. यात जळगाव जिल्ह्यात ...

जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस
इशारा : हतनूर धरणाचे १४ दरवाजे
उघडले
जळगाव : खान्देशात मंगळवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तर त्याखालोखाल धुळे जिल्ह्यात पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यात मात्र रिमझिम हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील वाघूर व तापी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर अमळनेर तालुक्यातील सात्री येथील बालिकेला नदीच्या पुरामुळे उपचारांसाठी नेता आले नाही. यामुळे नदी पार करण्याचा प्रयत्न करीत असताना नदीकाठीच तिचा मृत्यू झाला.
जळगाव जिल्ह्यातील वाघूर व हतनूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे धरणांच्या पातळीत चांगलीच वाढ होत आहे. हतनूर धरणाचे मंगळवारी दुपारी ४ वाजता १४ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून वाघूर धरणाचेही दरवाजे केव्हाही उघडे करावे लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात सरासरी ११.३ मि.मी. पाऊस झाला असून दुपारनंतर पावसाने चांगलाच जोर धरला.
अनेक लहान-मोठ्या नद्यांना पूर
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे तितूर आणि डोंगरी तर अमळनेर येथे बोरी व जामनेरला कांग नदीला पूर असून जामनेर आणि भुसावळचा रस्ता बंद झाला. जामनेर तालुक्यातील पहूर आणि तळेगाव या गावांमध्ये पाणी शिरले. काही घरांमध्ये पाणी आल्याने लोकांचे हाल झाले. काही दुकानांमध्येही पाणी शिरले. याच तालुक्यात वादळामुळे ओझरखुर्द व ओझरबुद्रुक येथे सुमारे ५० घरांचे पत्रे उडाले. तर तीन जण जखमी झाले.
चौकट
पुरामुळे बालिकेचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात बोरी नदीला पूर आला. अशात सात्री येथील आरुषी सुरेश भिल (१३) ही मुलगी तापाने फणफणत होती. गावात डॉक्टर नाही. अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारांसाठी बाहेरगावी नेण्यासाठी नदीकाठावर आणले. नदीवर मात्र पूल नाही. तरीदेखील काही तरी प्रयत्न करू ...पण दुर्दैव...! तेथेच नदीकाठी त्या निष्पाप बालिकेचा मृत्यू झाला. यामुळे सारा गाव हळहळला.