लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरोग्य विभागातील पदोन्नत्यांसह, मूळ जबाबदाऱ्या सोडून मुख्यालयात थांबून राहत असलेले कर्मचारी यावरून सत्ताधारी सदस्य अमित देशमुख यांनी स्थायी समितीच्या सभेत आक्रमक भूमिका मांडली. सभेत केवळ एकच विषय असल्याने आयत्यावेळच्या विषयांवर अधिक चर्चा झाली. यात बोगस सॅनिटायझर प्रकरणात कारवाईची मागणीही करण्यात आली.
स्थायी समितीची सभा अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला माळके, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, सदस्य मधुकर काटे, प्रताप पाटील, कैलास परदेशी, आदी सदस्यांची उपस्थिती होती. बऱ्याच कालावधीनंतर ही पहिलीच ऑफलाईन सभा घेण्यात आली. दरम्यान, वरसाडे (ता. पाचोरा) या ग्रामपंचायतीत वित्त आयोगात साडेतीन लाखांचा घोळ असल्याचा आरोप सदस्य मधुकर काटे यांनी केला. वसुंधरा अभियानात गौरव झाल्याने सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
मिनी हायमास्टमध्ये दुजाभाव
मिनी हायमास्टची कामे देऊ नये, असे जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना आमदारांची कामे कशी आली, असा सवाल उपस्थित करून सदस्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा अमित देशमुख यांनी यावेळी मांडला.
ग्रामपंचायत विभागाची अगदी वेळेवर फाईल
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या पदोन्नतीसंदर्भातील फाईल ग्रामपंचायत विभागाने स्थायी समिती सभेच्या अगदी एक दिवस आधीच सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केली. यात १६ ग्रामविकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारी, तर ४५ ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती मिळणार आहे.
साथीच्या आजारांबाबत दक्ष राहा
जलव्यवस्थापन समितीची सभा गुरुवारी सकाळी ११ वाजता पार पडली. यात अध्यक्षा रंजना पाटील यांनी पावसाळ्यात साथीचे आजार पसरणार नाही, याबाबत दक्षता बाळगावी, अशुद्ध पाणीपुरवठा होणार नाही, याबाबत सतर्क राहावे, अशा सूचना अध्यक्षा पाटील यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.