शिक्षकांच्या कोरोना चाचणीसाठी आरोग्य विभागाच्या ‘एनओसी’ची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST2021-01-19T04:18:33+5:302021-01-19T04:18:33+5:30
जळगाव : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यास सोमवारी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. नववी ते ...

शिक्षकांच्या कोरोना चाचणीसाठी आरोग्य विभागाच्या ‘एनओसी’ची गरज
जळगाव : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यास सोमवारी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्याच सूचनांचे पालन करण्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे. मात्र, अद्याप शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यासंदर्भात कुठलीही सूचना नसल्यामुळे जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. ए. अकलाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जळगाव जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या १ हजार ९२८ शाळा आहेत़. या शाळांमध्ये ३ लाख १० हजार २०१ विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांना २० हजार ५४४ शिक्षक अध्यापन करतात. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने मार्च महिन्यापासून थैमान घातल्यामुळे शाळा बंद होत्या. डिसेंबर महिन्यात प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. आता पुढील टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे़. त्यामुळे नववी ते बारावीचे वर्ग सुरू करताना ज्या सूचना करण्यात आल्या होत्या, त्या सूचनांचे पालन पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करताना करावे, असे शासनाने कळविले आहे. दरम्यान, सात ते आठ दिवसांत शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे २० हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करणे शक्य नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी व आरोग्य विभागाशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येणार आहे.
१ कोटी ६१ लाखांचा निधी प्राप्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये आवश्यक सुविधा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये या सुविधा असाव्यात म्हणून पूर्वतयारीसाठी अर्थात सॅनिटायझर व इतर वस्तूंसाठी १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी शिक्षण विभागाला उपलब्ध झाला आहे. तो शाळांना वर्ग केला जाणार आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे शाळांना बंधनकारक असेल. पूर्वतयारीसाठी १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तो निधी जिल्हा परिषद शाळांना पाठविण्यात येणार आहे. शिक्षकांच्या कोरोना चाचणीसंदर्भात जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाशी चर्चा करू.
- बी. ए. अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग
--------------------
जिल्ह्यातील शाळांची संख्या
- १९२८
----------------
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या
- ३,१०,२०१
-------------------
जिल्ह्यातील शिक्षक
- २०५५४