वढोदा वनक्षेत्रातील ‘तो’ वाघ सुदृढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:36+5:302021-08-17T04:23:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रात एक वाघ जखमी झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यानुसार ...

वढोदा वनक्षेत्रातील ‘तो’ वाघ सुदृढ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रात एक वाघ जखमी झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यानुसार वन विभागाकडून या जखमी वाघाचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. अखेर शुक्रवार व शनिवारी डोलारखेडा, वायला परिसरात तीन वाघांची नोंद झाली असून, यामध्ये तीनही वाघ ठणठणीत असल्याचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांनी सांगितले.
डोलारखेडा-वढोदा वनक्षेत्रातील वायला परिसरात नागरिकांना एक वाघ जखमी अवस्थेत आढळून आला होता. याबाबत त्या नागरिकांनी वन विभागाला कळविले होते. वाघ जखमी अवस्थेत असल्याने त्या वाघावर उपचार करण्यासाठी वनविभागाकडून शोध मोहिम राबविण्यात आली होती.
सलग १० दिवस वन विभागाने चालवली शोध मोहीम
१. या बाबत पडताडणी करण्यासाठी वन विभागाने प्रारंभी दोन पथके आणि १० ट्रॅप कॅमेरे लावून गस्त सुरू केली होती. या शोधमोहिमेत पहिल्या पाच दिवसात वाघ आढळूनच आला नाही. परत एक पथक आणि १० ट्रॅप कॅमेरे लावून एकूण ३ पथक आणि २० ट्रॅप कॅमेरे लावून वन विभागाने २४ तास गस्त केली. यात १३ आणि १४ ऑगस्ट रोजी दोन ट्रॅप कॅमेऱ्यात वेगवेगळ्या पट्टेदार वाघ दिसून आले. दोन वाघांचा जंगलातील मुक्त संचार ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले गेले.
२. तर काही ठिकाणी वाघाच्या पाऊल खुणांची नोंद ही मिळाल्याने वन विभागाला दिलासा मिळाला, वनपरिक्षेत्रात वाघ जखमी नसल्याची खात्री पटली. गेल्या ६ ऑगस्टपासून गस्त सुरू असल्या नंतर १३ व १४ रोजी वाघाची छबी ट्रॅप कॅमेऱ्यात मिळून आल्या नंतर ही वन कर्मचाऱ्यांची गस्त सुरू ठेवण्यात आली आहे.
३. वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या मार्गदशनात फिरत्या पथकाचे वनाधिकारी तथा वढोदा वनक्षेत्राचे प्रभारी वनक्षेत्रपाल बी.के.थोरात , वनपाल पी.टी.पाटील, वनरक्षक व कर्मचारी वर्ग लक्ष ठेवून आहेत.
कोट
वनविभागाकडून ‘त्या’ जखमी वाघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी ठराविक भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. यामध्ये जे वाघ आढळून आले आहेत. ते सर्व वाघ वाघ सुदृढ आणि ठणठणीत आहेत.
-विवेक होशींग, उपवनसंरक्षक, जळगाव वनक्षेत्र