लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महावितरण जळगाव मंडळ कार्यालयातील अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख मोहम्मद शेख यांना धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आमदारांसह ३० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी कायम होती.
जाब विचारत गोंधळ घातला
मोहम्मद फारुख मोहम्मद शेख हे महावितरण जळगाव मंडळ कार्यालयात अधीक्षक अभियंता म्हणून १ जून २०१८ पासून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता चाळीसगावचे आमदार यांचा त्यांना फोन आला व भेटायचे आहे असे सांगितले. सायंकाळी ५.१० आमदार मंगेश चव्हाण यांनी काही शेतकऱ्यांसह महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याचे कार्यालय गाठले व तुम्ही शेतकऱ्यांचे शेती पंपांचे कनेक्शन का तोडले, असा जाब विचारत गोंधळ घातला. नंतर एकेरी भाषेतून बोलत आमदार अधीक्षकांच्या अंगावर धावून आले.
अंगावर फेकले पैसे
तुला पैसे पाहिजेत का, असे बोलून आमदार चव्हाण यांनी अधीक्षक अभियंता फारुख शेख यांच्या अंगावर त्यांच्या हातातील वीज बिलाचे पैसे फेकले. नंतर आमदारांसोबत असलेल्या नागरिकांनीही आरडाओरड करीत गोंधळ घातला.
खिडकीच्या पडद्यांची तोडफोड
संतप्त आमदारांसह त्यांच्यासोबत आलेल्यांनी अधीक्षक अभियंता यांना दोरीने बांधून थेट कार्यालयाबाहेर उचलून नेले. तसेच कार्यालयातील साहित्य व पडद्यांची तोडफोड केली, असे तक्रारीत म्हटले आहे. अखेर रात्री अधीक्षक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदारांसह ३० जण ताब्यात
आमदारांना सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून पोलीस अधीक्षकांनी ताब्यात घेतले तर आधीच शेतकऱ्यांना महावितरणच्या कार्यालय आवारातून ताब्यात घेतले होते. आमदारांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात बसविण्यात आले होते. इतर ताब्यात घेतलेल्या ३० जणांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.
असे आहेत कलम
आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांवर भादंवि कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ३५१, २९४, २६९, १८८ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १३५ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यकीय तपासणी
रात्री ताब्यात घेतलेल्या ३० जणांची पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. तसेच आमदारांना ताब्यात घेतल्याचेही पोलिसांनी मुंबई येथे कळविल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
पोलीस, महावितरण कर्मचारी, कार्यकर्त्यांचा ठिय्या
महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दोरीने बांधून कार्यालयाबाहेर नेल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यात पोहोचला. यामुळे प्रचंड खळबळ उडाली व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या बाहेर महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह राजकीय पदाधिकारी, कायकर्ते व पोलिसांना ठिय्या रात्री उशिरापर्यत कायम होता.