या फरार २० आरोपींना आपण पाहिलंत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:50+5:302021-09-15T04:20:50+5:30
सुनील पाटील जळगाव : न्यायालयाकडून वारंवार वाॅरंट निघूनही जिल्ह्यात ४७ आरोपी अद्यापही पोलिसांना मिळून आलेले नाहीत, त्यामुळे ‘या फरार ...

या फरार २० आरोपींना आपण पाहिलंत का?
सुनील पाटील
जळगाव : न्यायालयाकडून वारंवार वाॅरंट निघूनही जिल्ह्यात ४७ आरोपी अद्यापही पोलिसांना मिळून आलेले नाहीत, त्यामुळे ‘या फरार आरोपींना आपण पाहिलंत का?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. अर्थात फरार आरोपींच्या शोधार्थ महानिरीक्षकांच्या आदेशाने दरवर्षी विशेष मोहीम राबविण्यात येते, यात मोठ्या संख्येने फरार आरोपी मिळून आले असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहेत. सर्वाधिक फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतला आहे, तरी देखील अद्यापही ४७ आरोपी रेकॉर्डला फरार आरोपी आहेत.
जळगाव जिल्ह्यात आठ उपविभाग असून त्याअंतर्गत ३६ पोलीस ठाणे आहेत. यापैकी जळगाव, अमळनेर व भुसावळ या तीन उपविभागातच सर्वाधिक फरार आरोपी आहेत. चाळीसगाव उपविभागात फक्त एक फरार आरोपी आहे. मुक्ताईनगर, फैजपूर, पाचोरा व चोपडा या उपविभागात एकही फरार आरोपी रेकॉर्डला नाही. बहुतांश प्रकरणात फरार आरोपी मयत झालेले आहेत, संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायतीकडून मृताचा दाखल प्राप्त करुन तो न्यायालयात सादर करुन ती संख्या कमी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी तर २० ते २५ वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना गुजरात व मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून न्यायालयात हजर केले होते.
उपविभाग फरार आरोपी
जळगाव 12
भुसावळ 16
मुक्ताईनगर 00
फैजपूर 00
पाचोरा 00
चाळीसगाव 01
अमळनेर 18
चोपडा 00
एकूण 47
वीस वर्षांपासून फरार आरोपी सापडला
गेल्यावर्षी दोन आरोपी पोलिसांनी असे शोधून काढले की ते अनुक्रमे २० व २२ वर्षांपासून फरार होते. एक खुनाच्या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर हजरच झाला नाही तर दुसरा बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी होता. गुजरात व मध्य प्रदेशातून या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याशिवाय आता फरार असलेल्यांच्या यादीत १० ते १५ वर्षांपासून फरार असलेल्यांची संख्या १२ च्यावर आहे.