जळगाव । आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. यात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे मात्र विद्याथ्यार्नी सोशल मीडियाचा वापर करताना तो योग्य कामासाठी करावा. आयुष्यात वेळेचं काटेकोर नियोजन हे सर्वात महत्वाचे आहे. आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या कामात व अभ्यासात प्रामाणिकपणा आणि मेहनत कायम ठेवा असे प्रतिपादन गुलाबराव देवकर इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी अँड रिसर्च सेंटरचे प्राचार्य नितीनचंद्र पाटील यांनी केले.त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी महाविद्यालयात नुकताच "यशाची गुरुकिल्ली' हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन मनोज पाटील, प्राचार्य हर्षल तारे उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. पाटील यांनी सांगितले की, महाविद्यालयीन जीवनात विद्याथ्यार्नी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आपल्या आई-वडिलांना समाधान वाटेल असे काम केले पाहिजे. अपयशाने खचून न जाता प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करावा. अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे नेहमी लक्षात ठेवावे. प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्याच्या प्रश्नांचे निरसन केले. कार्यक्रमास फार्मसीच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लोकेश बरडे यांनी केले तर प्रा. स्वप्नील देव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. प्रांजल घोलप यांनी केले़