गुन्हा दाखल : बदनामी टाळण्यासाठी पाठविले पैसे
जळगाव : शहरातील एका महिलेचे तिच्या मुलगा व सुनेसोबतच्या फोटोत छेडछाड करून महिलेच्या मुलाकडे संशयिताने पैशाची मागणी केली असून, काही रक्कम या मुलाने दिलीदेखील. याप्रकरणी शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील तरुणाचे फेसबुकवर अकाऊंट आहे. काही दिवसापूर्वी या तरुणाने त्याच्यासोबत पत्नी व आईचे फोटो फेसबुक अकाऊंटवर अपलोड केले होते. एका विकृताने ते फोटो डाऊनलोड करून त्यात छेडखानी करत त्यात अश्लीलता निर्माण केली. त्यानंतर हे फोटो तरुणाच्या व्हाॅट्सॲपवर पाठविले. याबाबत माहिती देण्यासाठी पलीकडून त्या विकृताने तरुणाला २ सप्टेंबर रोजी फोन केला. मात्र कामाच्या गडबडीत त्याने तो फोन उचलला नाही.
काही वेळाने व्हाॅट्सॲपवर पत्नी व आईचा छेडखानी केलेला अश्लील फोटो दिसला. फोटोसोबत एक हजार रुपयाची मागणी करण्यात आलेला मजकूर लिहून आला होता. त्याच मोबाईल क्रमांकावरून त्या तरुणाला पुन्हा फोन आला. फोन पेच्या माध्यमातून एक हजार रुपये पाठव अन्यथा तुझ्या पत्नी व आईचे फोटो व्हायरल केले जातील. या धमकीमुळे तरुणाने चुलत भावाला सर्व प्रकार कथन करून त्याच्या फोन पे ॲपच्या मदतीने त्या विकृताला एक हजार रुपये पाठविले. त्यानंतर विविध चार क्रमांकावरून सतत फोन करून तीन हजार रुपयांची मागणी करत तरुणाला हैराण करून सोडले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संशयिताने अश्लील फोटो, अश्लील मजकूर आणि एक सोबत एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक केले असता त्याला त्याच्या पत्नीचे वेबसाईटवर अपलोड केलेले अश्लील फोटो दिसून आले. २ ते ८ सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी शनिवारी तक्रार देण्यात आली असून, सायबर पोलीस तपास करीत आहेत.