जळगावात ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव, 40व्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 13:12 IST2017-12-15T13:10:02+5:302017-12-15T13:12:28+5:30
वाचक व हितचिंतकांच्या स्वागतासाठी सजले ‘लोकमत भवन’

जळगावात ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव, 40व्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहसोहळा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 15- ‘पत्रकारिता परमो धर्म’ हे ब्रीद घेतलेल्या ‘लोकमत’ने खान्देशवासीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. वाचकांचे प्रेम आणि विश्वासाच्या बळावर 41 व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या ‘लोकमत’चा वर्धापन दिन शुक्रवार, 15 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या निमित्त सकाळपासूनच ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असून अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून तसेच सोशल मीडियावरून अनेक जण शुभेच्छा देत आहेत. वाचक व हितचिंतकांच्या स्वागतासाठी ‘लोकमत भवन’सजले आहे.
‘लोकमत’च्या एमआयडीसी कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळात स्नेहसोहळा होणार आहे. वाचक, हितचिंतक व स्नेहीजनांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी केले आहे.
बघता-बघता खान्देशच्या मातीशी ‘लोकमत’ एकरूप झाला आणि खान्देशवासीयांनी ‘लोकमत’ला आपलेसे केले आहे. गेल्या 40 वर्षापासून विश्वासाचे हे नाते दिवसेंदिवस दृढ होत आहे. ‘लोकमत’ने नेहमीच चांगल्या कामांना प्रोत्साहन दिले, म्हणूनच ‘लोकमत’ महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला आहे.