(कुजबुज)अजय पाटील
सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली, चर्चा होणार होती जिल्हा बँकेची.. मात्र प्रत्यक्षात झाली कोरोनाची. चार माजी पालकमंत्री, विद्यमान पालकमंत्री अर्धा डझन आमदार, माजी आमदार जमले. कोणाचा कोरोना डेंजर आणि कोणाला किती लागला खर्च यावर बराच वेळ चालला खल. अर्ध्यात आमदारकीचा राजीनामा देऊन माजी आमदार झालेल्यांनी कोरोनावर ५ लाखांचा खर्च लागल्याचे सांगितले. मात्र, खर्चासाठी कोट्यातून २ लाखच मिळाल्याने त्यांनी व्यक्त केली खंत. मग काय हजरजबाबी जिल्ह्याच्या मंत्र्यांनी अर्धे आमदार असलेल्यांना अर्धेच मानधन मिळत असल्याचा टोमणा हाणला, अन् बैठकीत हशाच पिकला. त्यावर कधीकाळी हाडवैरी असलेल्या मात्र सध्या एकाच पक्षात असलेल्या ज्येष्ठ नेत्यानेही संधी सोडली नाही. म्हणे एवढे मोठे वडिलोपार्जित सराफाचे दुकान, मग २ लाख कमी भेटले म्हणून का हे रडगाणं... , राजीनामा देण्याआधी केला नाही विचार म्हणून, अर्ध्या आमदारांना मिळणार अर्धेच मानधन.