मिरची ग्राउंड परिसरातील गटारी तुंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:08+5:302021-09-03T04:18:08+5:30
भुसावळ : येथील मिरची ग्राउंड परिसर, म्हाडा कॉलनी भागातील गटारी तुंबल्याने परिसरात डेंग्यूचा धोका अधिकच निर्माण झाला आहे. ...

मिरची ग्राउंड परिसरातील गटारी तुंबल्या
भुसावळ : येथील मिरची ग्राउंड परिसर, म्हाडा कॉलनी भागातील गटारी तुंबल्याने परिसरात डेंग्यूचा धोका अधिकच निर्माण झाला आहे. परिसरात डासांची पैदास खूप वाढली आहे. सध्या शहरात डेंग्यूमुळे एका २१ वर्षीय युवकाला जीव गमवावा लागला आहे. यामुळे नागरिक भयभीत आहेत. गटारी तुंबल्याने घरातही घाण वास येत आहे. काही घरांच्या किचन आणि बाथरूमच्या पाईपवर घाण पाण्याची लेव्हल आली आहे. दुर्ग॔धीमुळे घराच्या बाहेर थोडा वेळ देखील उभे राहू शकत नसल्याची संतप्त भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
गेल्या दहा वर्षांपासून या भागातील नागरिक हा त्रास सहन करत आहेत. नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी मागील वर्षी गटारींचा गाळ काढला होता. पण काही दिवसात ही समस्या परत तशीच आहे. याप्रकरणी लोकप्रतिनिधी यांनी पाहणी करून आश्वासन दिले होते. मात्र पाठपुरावा झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. नगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन मिरची ग्राउंड भागातील गटारीची समस्या तत्काळ सोडवावी, अन्यथा जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करू, असे परिसरातील रहिवासी आनंद सपकाळे यांनी सांगितले.
काय आहे नेमकी समस्या?
मिरची ग्राउंड येथे संपूर्ण नवीन म्हाडा कॉलनी आणि शेजारी असलेल्या लक्ष्मी नगरच्या गटारींचे संपूर्ण पाणी जमा होते. मात्र या पाण्याचा पुढे निचरा होत नाही. यासाठी जे पाईप लावले आहेत त्यांचा उतार चुकीच्या दिशेने काढला आहे. म्हणून पाणी पुढे जात नाही व तुंबते. ही समस्या सोडविण्यासाठी कॉलनीतील दोन ठिकाणचे पाईप बदलून गटारीच्या पाण्याला योग्य उतार दिला तरच ही समस्या कायमस्वरूपी सुटेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.