जामनेरच्या व्यापाऱ्याच्या घरातून ३ लाखांचा गुटखा जप्त
By Ajay.patil | Updated: April 16, 2023 18:36 IST2023-04-16T18:36:27+5:302023-04-16T18:36:45+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

जामनेरच्या व्यापाऱ्याच्या घरातून ३ लाखांचा गुटखा जप्त
जळगाव - आरोग्यास हानीकारक व दुष्परीणामकारक अन्नपदार्थ तंबाखुजन्य गुटखा विक्री व खरेदीस बंदी असतानाही, अनेक ठिकाणी लपून-छपून गुटख्याची विक्री केली जात असते. शनिवारी दुपारी जामनेर येथील ओमशांतीनगर भागातील एका व्यापाऱ्याचा घरातून २ लाख ९५ हजार रुपये किमतीचा अनधिकृत गुटख्याचा माल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.
जामनेर येथील ओमशांतीनगर भागातील रहिवाशी सुरेशचंदजी सुराणा असे व्यापाऱ्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडे सुरेशचंदजी सुराणा यांच्या घरात अनधिकृतपणे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ तंबाखुजन्य गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांच्या सूचनेनुसार शनिवारी दुपारी ३ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुराणा यांच्या घराची झडती घेतली. या झडतीदरम्यान घरात २ लाख ९५ हजार रुपये किंमतीचा माल आढळून आला.
या प्रकरणी संबधित व्यापारी विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलीस नाईक किशोर राठोड, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, रुपाली खरे, भरत पाटील यांचा समावेश होता.