पारोळा येथे तरुणांच्या दोन गटात हाणामारी
By Admin | Updated: May 21, 2017 17:22 IST2017-05-21T17:22:25+5:302017-05-21T17:22:25+5:30
एनईएस बॉईज हायस्कुलच्या मैदानावर शनिवारी रात्री काही टारगट मुलांनी दोन गटात हाणामारी केली, शिवीगाळ केली.

पारोळा येथे तरुणांच्या दोन गटात हाणामारी
पारोळा,दि.21-येथील एनईएस बॉईज हायस्कुलच्या मैदानावर शनिवारी रात्री काही टारगट मुलांनी दोन गटात हाणामारी केली, शिवीगाळ केली. याच दरम्यान दगडही भिरकवण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलांमध्ये पळापळ झाली. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल नाही.
शहरातील एनईएस बॉईज हायस्कुल शाळेचे मोठे मैदान आहे. मैदान खुले असल्याने, या परिसरात रात्री काही महिला शतपावलीसाठी येत असतात. तर मैदान मोकळे असल्याचा फायदा काही टारगट मुले घेत आहे. याठिकाणी दुचाकी लावून ते बसतात. मद्यपान, धुम्रपान करणे ही नित्याची बाब झालेली आहे.
शनिवारी रात्रीही टारगट मुलांचे दोनगट एकमेकांसमोर आले. त्यांच्यांत भांडण सुरू होऊन हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावरील कपडे फाडले. अलि शिवीगाळ करण्यात आली. काहींनी दगडफेकही केली.
यामुळे रात्री शतपावलीसाठी फिरायला आलेल्या महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. जवळपास अर्धातास हा वाद सुरू होता. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांना या घटनेची कोणतीही माहिती नाही.