पुण्याला गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:22+5:302021-06-26T04:12:22+5:30
जळगाव : मुलांसह पुण्याला गेलेल्या लता मधुकर महाजन (रा. शिव कॉलनी) यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत १ ...

पुण्याला गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांचा डल्ला
जळगाव : मुलांसह पुण्याला गेलेल्या लता मधुकर महाजन (रा. शिव कॉलनी) यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजता उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लता मधुकर महाजन या शिव कॉलनी येथे मुलगा मयूर व मुलगी सोनम यांच्यासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री तिघेही घराला कुलूप लावून पुण्याला नातेवाइकांकडे गेले. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारून दागिने व रोकड चोरून नेली. गुरुवारी दुपारी १ वाजता महाजन यांच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली. ही घटना कळताच, महाजन यांच्या लहान बहिणीचे पती मदन माळी यांनी शिव कॉलनी गाठले व घराची पाहणी केली. यावेळी सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले, तर घरातून १ लाख ५ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. ही माहिती लागलीच त्यांनी लता महाजन यांना कळविली. तसेच चोरीची माहिती कळताच, पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर मदन माळी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. उषा सोनवणे करीत आहेत.