मूग, उडीद, कडधान्य पीक बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:49+5:302021-07-15T04:12:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हरताळा, ता. मुक्ताईनगर : गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने कडधान्य पेरणीच्या काळात पेरणीनंतर पाऊसच पडला नसल्याने ...

मूग, उडीद, कडधान्य पीक बुडाले
लोकमत न्यूज नेटवर्क
हरताळा, ता. मुक्ताईनगर : गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने कडधान्य पेरणीच्या काळात पेरणीनंतर पाऊसच पडला नसल्याने उडीद, मूग उगवलेच नाही. पावसाअभावी पेरले असता तेही करपले. त्यामुळे मूग, उडीद, चवळी आदी कडधान्याचे उत्पन्न बुडाल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.
डोंगराळ भागात उडीद, मूग, चवळी कडधान्य चांगले येते; परंतु ५० टक्क्यांपेक्षा अधिक भागात अजूनही पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबलेल्या दिसत आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कडधान्यासाठी वेळेवर पाऊस येणे महत्त्वाचे असते. ६५ दिवसात काढणीला येणाऱ्या पिकांची पेरणी जुलैच्या दोन आठवडे आधी झाली तरी त्यावर पावसाअभावी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यात सरासरी १५ जूननंतर कडधान्याची पेरणी केली जाते. आता एक महिना उलटला तरी या पिकाविषयीचे चित्र अधांतरीच आहे.
गतवर्षाच्या खरीप हंगामात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरात हाताशी आलेले मूग व उडीद पीक बुडाले होते. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने या परिस्थितीत परिसरातील निम्म्यापेक्षा अधिक डोंगराळ भागात पाऊसच नसल्याने निम्म्यापेक्षा अधिक भागात पेरणी होऊ शकली नाही. तसेच उगवलेल्या पिकाचेही खरे नसल्याच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही कडधान्याच्या हंगामापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.