दीड वर्षापासून बेपत्ता नातीला पाहून आजी-आजोबांना अश्रू अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST2021-05-25T04:17:42+5:302021-05-25T04:17:42+5:30
रविवारी मध्यरात्रीच्या या घटनेचे गावातील बरेच जण साक्षीदार होते. हे दृश्य पाहून उपस्थित शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू तरारले होते. ...

दीड वर्षापासून बेपत्ता नातीला पाहून आजी-आजोबांना अश्रू अनावर
रविवारी मध्यरात्रीच्या या घटनेचे गावातील बरेच जण साक्षीदार होते. हे दृश्य पाहून उपस्थित शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू तरारले होते. ही हृदयद्रावक घटना आहे येथील धोबीवाडा परिसरातील. बालिकेचा शोध घेऊन तिला सुखरूप आणणाऱ्या यावल पोलिसांचे कौतुक होत आहे.
शहरातील धोबीवाडा परिसरातील भीमसिंग कोळी यांच्या मुलीची मुलगी येथे इयत्ता तिसरीचे प्राथमिक शिक्षण घेत असताना १९ नोव्हेंबर २०१९ रोजी म्हणजे दीड वर्षांपूर्वी शाळेत दप्तर ठेवून बेपता झाली होती. जळगाव येथे तिची राहत असलेल्या आईकडे आजोबांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईसुद्धा बेपता होती. तेव्हापासून आजोबा नातीच्या शोधात होते. दीड वर्षानंतर अचानक २४ एप्रिलला सकाळी ४ वाजेच्या सुमारास आजोबांना फोन आला की, मी उत्तर प्रदेशातून ट्विंकल बोलत असून, मी येथे आहे. माझ्या आईचे पाच-सहा दिवसांपूर्वीच निधन झाले. ती नेमकी कोठे आहे, हे मात्र तिला सांगता येत नव्हते. तेव्हापासून नात आजोबाच्या संपर्कात होती. बाबा माझे कपडे फाटले आहेत, मला चप्पल नाही, तुम्ही मला कपडे- चप्पल पाठवा. इकडे काय करावे आणि कसे? या द्विधा अवस्थेत बालिकेचे आजोबा असताना येथील भाजपचे शहर अध्यक्ष डॉ. नीलेश गडे यांना ही बाब कोळी यांनी सांगितली. डॉ. गडे यांनी तेथील काही व्यक्तींशी संपर्क साधला व हळूहळू पत्ताही माहीत झाला. त्यानंतर आजोबांसमवेत येथील पो. नि. सुधीर पाटील यांची डॉ. गडे यांनी भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. पो. नि. पाटील यांचेही हृद हेलावले. त्यांनी तातडीने नोंद घेऊन विनोद खांडबहाले या तरुण फौजदारासह सहायक फौजदार विजय पाचपोळे यांच्यावर तपासाची जबाबदारी साेपविली. २१ जून रोजी खांडबहाले तिच्या आजोबांना घेऊन गोरखपूरकडे रवाना झाले. शनिवारी गोरखपूर, बडहलगंज येथून यूपी पोलिसांसह नेपाळच्या सीमेवरील दुर्मीळ भागात वसलेल्या देरवा चौक या वस्तीवर जाऊन पोहोचले.
अतिशय हृदयद्रावक प्रसंग
वस्तीवर पोहोचल्यानंतर यूपी पोलिसांनी पाणी भरत असलेल्या एका बालिकेकडे बोट दाखविले आणि कोळी यांना विचारले की, क्या यह लडकी है वो। कोळी यांनी क्षणभराचा विचार न करता ट्विंकल म्हणून आवाज दिला. ट्विंकल आवाज येताच, ती अल्पवयीन मुलगी पाण्याची बादली जागेवर सोडून बाऽऽबा... म्हणून ओरडत कोळी यांच्या अंगास चिकटली. या प्रसंगाचे साक्षीदार यूपी पोलिसांसह यावल पोलीस पथक आणि वस्तीवरील नागरिक होते.
दोन दिवस भुकेल्या पोटाने प्रवास
शनिवारी बडहलगंज पोलिसांचे आभार मानत पथक बालिकेस घेऊन रात्री यावलकडे येण्यास निघाले. मात्र, यूपीमध्येही लॉकडाऊन असल्याने त्यांना रात्रीचे जेवण मिळाले नाही. रेल्वे स्थानकासह रेल्वेतही त्यांना जेवण मिळाले नसल्याने पथकासह बालिका, आजोबा भुकेलेच यावलला पोहोचले. भुकेचे त्यांना काही वाटले नाही. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते ते आजोबा-नातीच्या भेटीचे. यात पो.नि. सुधीर पाटील हे पथकाच्या संपर्कात होते. मध्यरात्री पोलीस यावलला पोहोचल्यानंतर धोबीवाड्यात तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तेव्हा नात पोलीस वाहनातून उतरताच ट्विंकलने हंबरडा फोडतच आजीला मिठी मारली. यावेळी सारेच सुन्न झाले होते.