नातीचा गृहप्रवेश आजोबांनी केला वाजत गाजत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:21+5:302021-08-26T04:19:21+5:30
आमडदे, ता. भडगाव : आमडदे येथील रहिवासी भगवान आनंदा भोसले यांची कन्या हिमानी हिला कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल आजोबांनी गावात ...

नातीचा गृहप्रवेश आजोबांनी केला वाजत गाजत
आमडदे, ता. भडगाव : आमडदे येथील रहिवासी भगवान आनंदा भोसले यांची कन्या हिमानी हिला कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल आजोबांनी गावात नातीचे स्वागत वाजतगाजत केले.
हिमानी हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी मोठ्या थाटात रणाईचे येथील रहिवासी हल्ली मुक्काम उदना (सुरत) वसंतराव आधार पाटील यांचे पुत्र चेतन वसंतराव पाटील यांच्याशी झाला होता. चेतन व हिमानी हे दोन्ही फार्मसीत उच्चशिक्षित आहेत. कन्या प्राप्तीने या जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यात आजी-आजोबांना खूप आनंद झाला. आजोबांनी नातीचा गृहप्रवेश वाजतगाजत करण्याचे ठरविले.
पाचोरा येथील दवाखान्यातून रंगबिरंगी फुलांनी सजविलेले वाहन तयार करण्यात आले. नंदुरबार येथून खास वाजंत्रीची व्यवस्था करण्यात आली. गावात पारोळा बस स्टँडपासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. संपूर्ण घराला रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात आले होते. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना फुलांनी सजवलेले होते. चिमुकलीचा पाळणाही फुलांनी सजविण्यात आला होता.
गावातील नागरिकही चिमुकलीच्या स्वागतासाठी मिरवणुकीत सहभागी झाले होते. आगळावेगळा स्वागत समारंभ पाहून नागरिकही अचंबित झाले. आजोबा भगवान पाटील, चेतन पाटील, हिमानी पाटील या उच्चशिक्षित परिवाराने समाजाला प्रबोधनात्मक संदेश देऊन स्त्री भ्रूणहत्या टाळण्याचा अनमोल असा संदेश दिला. गावात व परिसरात भगवान भोसले यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
250821\img-20210825-wa0100.jpg~250821\25jal_5_25082021_12.jpg
आमडदे ता भडगाव~नातीचा गृहप्रवेश आजोबांनी केला वाजत गाजत