३ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकास पकडले
By Admin | Updated: May 7, 2014 01:44 IST2014-05-07T01:44:44+5:302014-05-07T01:44:44+5:30
तालुक्यातील रोहिणी येथे एका घरकुलाच्या रकमेचा चेक बँकेत जमा करण्यासाठी लाच स्वीकारताना ग्रामसेवक सतीश मुरलीधर मगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले

३ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकास पकडले
३ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकास पकडले रोहिणीत कारवाई : घरकुलाचे प्रकरण भोवले
चाळीसगाव : तालुक्यातील रोहिणी येथे एका घरकुलाच्या रकमेचा चेक बँकेत जमा करण्यासाठी लाच स्वीकारताना ग्रामसेवक सतीश मुरलीधर मगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई ६ रोजी सकाळी ११.२५ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. पोलीस सूत्रानुसार, तक्रारदार यांच्या आईच्या नावाने २००८ मध्ये त्यांच्या मालकीच्या रोहिणी येथील जागेवर चाळीसगाव पं.स. कडून घरकुल मंजूर झाले होते. त्याच्या बांधकामापोटी त्यांच्या आईच्या नावाने २० हजार रु.चा धनादेश बँक खात्यात जमा झाला होता. परंतु त्यांच्या शेजारील घुगे यांनी घरकुल जागेबाबत वाद उपस्थित करुन त्यांना घरकुलाचा अंतिम रकमेचा धनादेश मिळू नये म्हणून हरकत घेतली होती. मात्र नंतर घुगे यांनी रोहिणीचे ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज देऊन तक्रार मागे घेतली होती. यानंतर तक्रारदार हे वेळोवेळी ग्रामसेवक सतीश मगर यांना भेटून आईच्या नावे असलेल्या घरकुलाच्या रकमेचा चेक काढून तो बँकेत जमा करण्याची मागणी करीत होते. तथापि ग्रामसेवकाने त्यापोटी ३ हजार रु. लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. परंतु तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनी ५ रोजी अँटी करप्शन ब्युरो जळगाव येथे तक्रार दिली. यानुसार पोलीस उपअधीक्षक डी.डी. गवारे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, माधवराव गरुड, सहायक फौजदार मोजोद्दीन शेख, प्रभाकर धनगर, ज्ञानदेव घुले, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब जाधव, राजन कदम, हेमंत शिरसाठ, नंदकिशोर सोनवणे, संजय अहिरे, विजय दुसाने, अनिल चौधरी यांच्या पथकाने ६ रोजी रोहिणी ग्रा.पं. कार्यालयात सापळा रचला. सकाळी ११.२५ वाजता तक्रारदाराकडून ग्रामसेवक मगर याला ३ हजार रु. लाच घेताना या पथकाने रंगेहात पकडून कारवाई केली. ग्रामसेवक मगर याच्याविरुध्द चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपायुक्त शशीकांत महावरकर, अपर पोलीस अधीक्षक बी.एस.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व सहकारी करीत आहे. (वार्ताहर)