यावेळी चाळीसगावचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी महाआवास अभियानात चाळीसगाव तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा नुकताच जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उंबरखेड ग्रामपंचायतीच्यावतीनेदेखील त्यांचा अभिनंदनाचा ठराव सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक उमेश करपे यांनी मांडला, तो सर्वानुमते संमत करण्यात आला.
तसेच सरपंच केदारसिंग धर्मा पाटील यांनी उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांच्या कामाचा गौरव केला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच पुढील विकासकामांचे नियोजन करण्यात आले. गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा व नागरी सुविधेबाबत ग्रामस्थांनी चर्चा घडवून आणली. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये विकासकामांबाबत सभेत माहिती देण्यात आली. महात्मा गांधी रोजगार हमी योजनाअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी केलेले मार्गदर्शन फारच उल्लेखनीय असल्याबाबत सरपंच यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसभेला गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.