शिरसाड येथील ग्रामसभा ‘विकासा’वरून गाजली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST2021-09-02T04:35:39+5:302021-09-02T04:35:39+5:30
मनवेल, ता. यावल : शिरसाड येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गावाच्या विकासाच्या व ग्रामपंचायतीच्या कारभारावरून चांगलीच गाजली. गावाच्या ३० ...

शिरसाड येथील ग्रामसभा ‘विकासा’वरून गाजली!
मनवेल, ता. यावल : शिरसाड येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गावाच्या विकासाच्या व ग्रामपंचायतीच्या कारभारावरून चांगलीच गाजली. गावाच्या ३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ आली.
प्रशासनाच्या निर्देशानुसार ३० रोजी शिरसाड ग्रा. पं. ची ग्रामसभा योजिली होती. सभा सुरू झाल्यापासून माजी सरपंच प्रवीण सोनवणे, माजी उपसरपंच धनंजय एकनाथ पाटील, नानाभाऊ सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांनी सत्ताधारी गटाला धारेवर धरून चौदाव्या वित्त आयोगाचे २५ लाख रुपये खर्च करून खोटी बिले टाकल्यामुळे खर्चाच्या तुलनेत गावाचा पाहिजे तो विकास झाला नाही, या मुद्द्यावरून ग्रामसभा गाजली.
सभेला सरपंच दीपक इंगळे, उपसरपंच राजेंद्र सोनवणे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. परंतु ग्रा.पं.कडून झालेल्या खर्चासंदर्भात कुठल्याही प्रकारचे उत्तर ग्रा.पं. प्रशासनास देता आले नाही व कुठल्याही कामकाजाचे दप्तर सभेत दाखवले नाही. त्यावरून सभा तहकूब करण्यात आली.
सभेला ग्रामस्थ महिला व पुरुष आणि तरुण वर्ग तसेच ग्रामसेवक दीपक तायडे उपस्थित होते. त्याचप्रमाणे गावातील वॉर्ड क्रमांक चारमध्ये खूप चिखल झाल्यामुळे धनंजय एकनाथ पाटील यांनी ग्रामपंचायतीला वाॅर्ड क्रमांक चारमध्ये रेती टाकण्यासाठी १० हजार रुपयांच्या पावत्या फाडून मदत म्हणून दिले.