हमीभाववाढीचा परिणाम : धान्य व डाळीच्या भावात २०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:39 PM2018-07-10T12:39:18+5:302018-07-10T12:41:02+5:30

मालाची आवक मंदावली

Grain and Pulses Prices | हमीभाववाढीचा परिणाम : धान्य व डाळीच्या भावात २०० रुपयांनी वाढ

हमीभाववाढीचा परिणाम : धान्य व डाळीच्या भावात २०० रुपयांनी वाढ

Next
ठळक मुद्देहळूहळू वाढ होणारसप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अधिक भाववाढीची शक्यता

विजयकुमार सैतवाल
जळगाव : खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याची केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर धान्य तसेच डाळींच्या भावात आतापासूनच वाढ होण्यास सुुरुवात झाली आहे. शहरात एकाच दिवसात धान्य व डाळींच्या भावात १०० ते २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.
खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारने वाढ करण्याची घोषणा करीत ४ जुलै रोजी त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. हमीभाव वाढविलेल्या पिकांमध्ये धान्य व कडधान्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
एकाच दिवसात मोठी वाढ
खरीप पिकांसाठी हा वाढीव हमीभाव मिळणार असला तरी आतापासूनच धान्य व डाळींचे भाव वधारत आहेत. ४ रोजी हमीभाव वाढीचा निर्णय झाला. त्यानंतर ६ जुलै रोजी उडीद डाळ वगळता इतर डाळी व ज्वारी, बाजरी यांच्या भावात वाढ झाली. ५ रोजी १४५० ते १५५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या बाजरीचे भाव ६ रोजी १६५० ते १७५० रुपयांवर पोहचले. अशाच प्रकारे १४०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल असलेले ज्वारीचे भाव ६ रोजी १७०० ते १९०० रुपये प्रती क्विंटल झाले. डाळींमध्ये ५५०० ते ५९०० रुपये प्रती क्विंटल असलेली तूर डाळ ५७०० ते ६१००, मूग डाळ ६४०० ते ६८०० वरून ६६०० ते ७००० आणि हरभरा डाळ ४४०० ते ४८०० वरून ४५०० ते ५००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे. उडीद डाळ मात्र ४४०० ते ४८०० रुपयांवर स्थिर आहे.
हळूहळू वाढ होणार
केंद्र सरकारने ज्या प्रमाणात हमीभावात वाढीची घोषणा केली आहे, त्या प्रमाणात आताची ही वाढ नसली तरी त्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे. सध्या शेतकºयांकडे जो माल शिल्लक आहे, तो माल आता शेतकºयांनी बाजारात आणणे थांबविले आहे. खरीप हंगाम येईल त्या वेळी माल विक्री केल्यास अधिक फायदा होण्याची प्रतीक्षा राहणार असल्याने सध्या आवक मंदावली असल्याचे सांगितले जात आहे.
मागणी नसताना भाववाढ
मागणी व पुरवठ्याच्या गणितानुसार चित्र पाहिले तर सध्या मागणी नसल्याने भाव कमी होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या मागणी नसताना धान्य व डाळींच्या भावात वाढ झाली आहे. बाजारात आवक थांबल्याने व नवीन हंगाम येईपर्यंत मालाची उपलब्धता कशी असेल हे सांगता येत नाही, त्यामुळे हा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अधिक भाववाढीची शक्यता
सध्या शालेय साहित्य खरेदीमुळे धान्य व डाळींच्या बाजारात उठाव नसतो. तसेच शेतकरीही शेती कामात व्यस्त असतो. त्यामुळे धान्य बाजारात सप्टेंबर-आॅक्टोबरपासून उलाढाल वाढीस सुरुवात होते. त्यात यंदा सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये नवीन हंंगामातील मालास वाढीव हमीभाव मिळण्यासह मागणी वाढून धान्य व डाळींचे भाव त्या काळात अधिक वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे.

हमीभाव जाहीर झाल्यानंतर त्या प्रमाणात धान्य व डाळींचे भाव सध्या वाढले नसले तरी १०० ते २०० रुपये प्रती क्विंटलने त्यात वाढ झाली आहे. सध्या मालाची आवकही थांबल्याने त्याचा परिणाम होत आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन, जळगाव.

Web Title: Grain and Pulses Prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.