‘त्या’ पोलिसांचा बडतर्फीचा आदेश शासनाकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:59+5:302021-09-10T04:22:59+5:30

जळगाव : लॉकडाऊनकाळातील दारू तस्करी केल्याचा ठपका ठेवून सेवेतून बडतर्फ केलेल्या आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे ...

Govt cancels police order | ‘त्या’ पोलिसांचा बडतर्फीचा आदेश शासनाकडून रद्द

‘त्या’ पोलिसांचा बडतर्फीचा आदेश शासनाकडून रद्द

जळगाव : लॉकडाऊनकाळातील दारू तस्करी केल्याचा ठपका ठेवून सेवेतून बडतर्फ केलेल्या आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव व मुख्यालयाचे मनोज केशव सुरवाडे या तिघांना राज्य शासनाने सेवेत सामावून घेतले असून तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचा आदेश रद्द केलेला आहे.

गेल्या वर्षी एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊनकाळात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्गावर अवैध दारूचा साठा पकडला होता. नशिराबाद येथील गोदामातून शहरातील काही दारू दुकाने व पाळधी येथे हा साठा नेण्यात येत होता. या तस्करीत पोलिसांनी मदत केल्याचा ठपका ठेवून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव व मुख्यालयाचे मनोज केशव सुरवाडे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते, तर तालुका पोलीस ठाण्याचे भारत शांताराम पाटील यांना निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालावरून तिघांना पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी बडतर्फ केले होते तर भारत पाटील यांना निलंबित केले होते. निरीक्षक शिरसाठ यांचा अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला होता.

कारवाईविरोधात न्यायालय व शासनाकडे अपील

या कारवाईविरोधात निरीक्षक शिरसाठ यांच्यासह सुरवाडे, पाटील व जाधव यांनी उच्च न्यायालय व राज्य शासनाकडे धाव घेतली होती. गृहविभागाकडे वेळोवेळी झालेल्या सुनावणीत पोलीस अधिकारी व या चारही जणांनी आपले म्हणणे, कागदपत्रे सादर केले. १७ जून २०२१ रोजी अंतिम सुनावणी होऊन ६ ऑगस्ट रोजी गृहविभागाने बडतर्फीची शिक्षा रद्द करून सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या तिघांना सेवेत सामावून घेत मुख्यालयात नियुक्ती दिली. दरम्यान, शिरसाठ यांच्याबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

कोट...

शासनाच्या आदेशानुसार तीन कर्मचाऱ्यांना आज सेवेत सामावून घेण्यात आले आहे. निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्याबाबत मात्र अजून शासनाचे आदेश प्राप्त झालेले नाही. तिघांना मुख्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे.

-डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

Web Title: Govt cancels police order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.