चलन भरण्यासाठीचे शासनाचे पोर्टल अर्धा तास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST2021-06-25T04:13:30+5:302021-06-25T04:13:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाच्या विविध कार्यालयासाठी चलन भरण्याच्या ग्रास पोर्टलवर अडचणी आल्याने गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ...

चलन भरण्यासाठीचे शासनाचे पोर्टल अर्धा तास बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाच्या विविध कार्यालयासाठी चलन भरण्याच्या ग्रास पोर्टलवर अडचणी आल्याने गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अर्धातास गोंधळ सुरू होता. त्यात तहसील कार्यालयासमोरील सहायक निबंधक कार्यालयात पुन्हा एकदा मोठी गर्दी झाली होती. याच कार्यालयात तांत्रिक अडचणींमुळे गर्दी होण्याची याच आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे.
याआधी सहायक निबंधक कार्यालयात मागील आठवड्यात १८ जून रोजी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने गर्दी झाली होती. त्यानंतर पुन्हा या कार्यालयात सर्व्हरला अडचण आल्याने गर्दी झाली. गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ग्रास या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचण आली. ज्यांनी ऑनलाईन चलन भरले होते. त्या चलनाची पडताळणी करण्यासाठीच्या लिंकला अडचण आली. त्यामुळे अर्धा तास कोणत्याच चलनाची पडताळणी होत नव्हती. त्याचा परिणाम म्हणून सर्वच सहायक निबंधक कार्यालयातील काम थांबले होते.
कोरोनाच्या काळात शासनानेच सर्व सहायक निबंधक कार्यालयातील कामे ही आधी वेळ निश्चीत करून मगच करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दर दहा मिनिटांनी हे एक अपॉईंटमेंट दिली जाते. मात्र तहसील कार्यालयाच्या समोर असलेल्या या दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीच गर्दी असते. याबाबत जिल्हा मुद्रांक अधिकारी व्ही.एस.भालेराव यांनी या कार्यालयातील गर्दी नियंत्रित करण्याच्या तोंडी सुचना या आधी देखील दिल्या आहेत.
ना मास्क ना सॅनिटायजेशन
शहरात एकुण तीन ठिकाणी सहायक निबंधक कार्यालये आहेत. त्यातील एक जिल्हाधिकारी कार्यालयात, दुसरे प्रशासकीय इमारतीत टप्पा क्रमांक तीन मध्ये आणि तिसरे कार्यालय हे तहसील कार्यालयाच्या समोर आहे. यातील तहसीलसमोर असलेल्या या कार्यालयात अनेकदा अडचणी येतात. या आधीही तेथे इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण होती. तेव्हा जवळपास दोन तास काम थांबले होते.
कोट
गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न नेहमीच करतो. मात्र ग्रामीण भागातील नागरिक हक्कसोड तसेच अन्य कामांसाठी गर्दी करतात. तसेच पावसाचाही अडचण आहे. पाऊस सुरू झाला की बाहेर उभे रहायला जागा नसते. त्यामुळे आलेले सर्व जण कार्यालयात येत असल्याने याठिकाणी गर्दी होते. आम्ही उद्यापासून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू. - संजय नाईक, प्रभारी सह निबंधक