मंदिरं बंद असल्याने सोशल मीडियावरून श्रावण महिन्याचा शुभेच्छांचा वर्षाव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : श्रावण महिना हा हिंदू धर्मीयांसाठी पवित्र महिना मानला जातो, तसेच श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भावामुळे राज्यातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आमदार खासदारांकडून नागरिकांना ऑनलाईन सोशल मीडियावरूनच शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसून येत आहेत.
खासदारही ट्विटरवर ॲक्टिव्ह
जिल्ह्यातील खासदार रक्षा खडसे व उन्मेष पाटील हे दोन्हीही खासदार फेसबुकसह ट्विटरवरदेखील ॲक्टिव्ह आहेत. श्रावण महिन्यातील जवळ-जवळ सर्वच सण-उत्सवांवर त्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.
गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जितके जनसामान्यांमध्ये ॲक्टिव्ह आहेत, तितकेच ते सोशल मीडियावरदेखील सक्रिय आहेत. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून ते या महिन्यात येणाऱ्या सर्वच सणांबाबत पालकमंत्र्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. आकर्षक छायाचित्रांचा वापर करण्यावर पालकमंत्र्यांचा भर दिसून येतो.
गिरीश महाजन
गिरीश महाजनांनी गोपाळकाला, कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना आकर्षक कोलाज तयार केले आहे. यासह मराठी भावगीतांच्या ओळींचा वापर केलेला आहे. कोलाज तयार करण्यासह शुभेच्छा देताना कविता व भावगीतांचा वापर गिरीश महाजनांनी केला आहे.
सुरेश भोळे
आमदार सुरेश भोळे हे जिल्ह्यातील सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे आमदार म्हणून ओळखले जातात. श्रावण महिन्यातीलच नाही, तर प्रत्येक सण असो वा उत्सव व ज्येष्ठ नेते, महापुरुषांची जयंती याबाबत आमदार भोळे फेसबुकवरून शुभेच्छा देताना दिसून येतात. श्रावण महिन्यातदेखील प्रत्येक सणाबाबत आमदार भोळेंकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
चिमणराव पाटील
पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत. मात्र, नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याद्वारे जनसंपर्क वाढविण्यावर आमदार पाटील यांचा भर दिसून येतो. श्रावण महिन्यातील गोपाळकाला, जन्माष्टमी, रक्षा बंधन, नागपंचमी व श्रावण सोमवारबाबत देखील चिमणराव पाटील यांनी फेसबुकवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
लता सोनवणे
चोपड्याचा आमदार लता सोनवणे या फेसबुकवर नेहमीच ॲक्टिव्ह असतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सण-उत्सवांबाबत फेसबुकवरूनच शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच श्रावण सोमवारनिमित्त नागेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन, त्या ठिकाणाहून चोपडा तालुक्यातील मतदारांना शुभेच्छा दिल्या.
मंगेश चव्हाण
जिल्ह्यातील युवा आमदार म्हणून ओळख असलेले चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण केवळ फेसबुकवरूनच नाहीत तर ट्विटर, इन्स्टाग्रामवरूनदेखील शुभेच्छा देताना दिसतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सण-उत्सवांबाबत त्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.