भुसावळ रेल्वेतील १७ इंजिन चालकांचा नोकरीला गुडबाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:58+5:302021-09-24T04:19:58+5:30
भुसावळ : रेल्वेची खाजगीकरणाकडे सुरू असलेली वाटचाल आणि त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सातत्याने होणारा त्रास यामुळे भुसावळ रेल्वे विभागातील १७ ...

भुसावळ रेल्वेतील १७ इंजिन चालकांचा नोकरीला गुडबाय
भुसावळ : रेल्वेची खाजगीकरणाकडे सुरू असलेली वाटचाल आणि त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सातत्याने होणारा त्रास यामुळे भुसावळ रेल्वे विभागातील १७ इंजिन चालकांनी नोकरीला गुडबाय केले आहे. या प्रकारामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रेल्वे खाजगीकरणाकडे जलदगतीने वाटचाल करीत आहे, यामुळे कर्मचाऱ्यांना काही न बोलता त्रासदायक काम करण्यास भाग पाडण्यात येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून रेल्वेत काम करणारे अनेक कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग पत्करत आहेत.
रेल्वे इंजिन ड्रायव्हर अर्थात लोको पायलट हा शेकडो प्रवाशांना घेऊन शेकडो मैलांचा प्रवास करत असतो, यासाठी त्यांना वेळोवेळी आरामही मिळणे गरजेचे आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून लोको पायलट अर्थात रेल्वे इंजिन चालकांना अगदी छोट्या कारणामुळे चार्जशीट देणे, रात्रपाळी भत्ता बंद करणे, अगदी छोट्या छोट्या कारणांमुळे कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात आहे. याला कंटाळून भुसावळ विभागातील १७ लोको पायलट यांनी ऑगस्ट महिन्यात स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) अर्ज केला, यापैकी १२ अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झाले असल्याची माहिती मिळाली.
कोट...
रेल्वे कर्मचाऱ्यांवर विविध अटी लादून मानसिक त्रास देण्याचे कार्य सुरू आहे. आता १७ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. वर्षभरात हा आकडा ५० पेक्षाही जास्त दिसेल. रेल्वे प्रशासनाकडून स्वेच्छनिवृत्ती पत्करावी याकरिता खटाटोप सुरू आहे.
- एस. आर. मोरे, विभागीय अध्यक्ष, ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन.