१७ इंजिन चालकांचा नोकरीला गुडबाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:00+5:302021-09-24T04:20:00+5:30

भुसावळ : रेल्वेची खासगीकरणाकडे सुरू असलेली वाटचाल आणि त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सातत्याने होणारा त्रास यामुळे भुसावळ रेल्वे विभागातील १७ ...

Goodbye to 17 engine drivers | १७ इंजिन चालकांचा नोकरीला गुडबाय

१७ इंजिन चालकांचा नोकरीला गुडबाय

भुसावळ : रेल्वेची खासगीकरणाकडे सुरू असलेली वाटचाल आणि त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सातत्याने होणारा त्रास यामुळे भुसावळ रेल्वे विभागातील १७ इंजिन चालकांनी नोकरीला गुडबाय केले आहे. या प्रकारामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रेल्वे खासगीकरणाकडे जलदगतीने वाटचाल करीत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना काही न बोलता त्रासदायक काम करण्यास भाग पाडण्यात येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून रेल्वेत काम करणारे अनेक कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग पत्करत आहेत. रेल्वे इंजिनचालक अर्थात लोको पायलट हा शेकडो प्रवाशांना घेऊन शेकडो मैलांचा प्रवास करत असतो. यासाठी त्यांना वेळोवेळी आरामही मिळणे गरजेचे आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून लोको पायलट अर्थात रेल्वे इंजिन चालकांना अगदी छोट्या कारणामुळे चार्जशीट देणे, रात्रपाळी भत्ता बंद करणे, अगदी छोट्या छोट्या कारणांमुळे कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात आहे. याला कंटाळून भुसावळ विभागातील १७ लोकोपायलट यांनी ऑगस्ट महिन्यात स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) अर्ज केला. यापैकी बारा अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झाले आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची अद्यापही आठ ते दहा वर्षांचा सेवा काळ बाकी आहे.

अशी आहेत मुख्य कारणे

- आराम न देताच रात्रपाळीची ड्युटी लावण्यात येते. यामुळे नोकरी करणे त्रासदायक झालेले आहे.

- एखाद्या वेळेस चूक झाली तर त्यासाठी अपमानित करण्यात येते.

- पूर्वी लोकपायलटला रात्रीचा भत्ता देण्यात येत होता. मात्र, सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून शासनाने भत्ता बंद केला आहे. ज्यांना भत्ता आधी दिलेला आहे त्यांच्याकडून आता वसुलीची प्रक्रिया राबविली जात आहे.

- कर्तव्याचा मानसिक ताण इतका आहे की याचा सरळ कुटुंबीयांवर परिणाम दिसून येत आहे.

- सातत्याने इंजिनमध्ये काम करण्यामुळे हायपर टेन्शन याशिवाय बहिरेपणा, रक्तदाब, मधुमेह याशिवाय अनेक व्याधी जडल्या आहेत.

कोट

रेल्वे कर्मचाऱ्यांवर विविध अटी लादून दाखवून मानसिक त्रास देण्याचे कार्य सुरू आहे. आता १७ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. वर्षभरात हा आकडा ५० पेक्षाही जास्त दिसेल. रेल्वे प्रशासनाकडून स्वेच्छानिवृत्ती पत्करावी याकरिता खटाटोप सुरू आहे.

- एस. आर.मोरे, विभागीय अध्यक्ष, ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन.

Web Title: Goodbye to 17 engine drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.