बीएचआरच्या ठेवीदारांसाठी खुशखबर ! नोव्हेंबरपासून मिळणार पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:20 IST2021-09-09T04:20:45+5:302021-09-09T04:20:45+5:30
जळगाव : बीएचआर घोटाळा प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या हार्डडिस्क तब्बल ११ महिन्यांनी अवसायकांना मिळाली असून त्यात ९० टक्के अपेक्षित ...

बीएचआरच्या ठेवीदारांसाठी खुशखबर ! नोव्हेंबरपासून मिळणार पैसे
जळगाव : बीएचआर घोटाळा प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या हार्डडिस्क तब्बल ११ महिन्यांनी अवसायकांना मिळाली असून त्यात ९० टक्के अपेक्षित डाटाही मिळाला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यात लेखापरीक्षण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नोव्हेंबरपासून ठेवीदारांना थेट त्यांच्या हक्काची रक्कम वाटपास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती बीएचआरचे अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूकप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांनी जळगावात येऊन बीएचआर पतसंस्था, अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर व इतरांकडे झाडाझडती केली होती. त्यावेळी दोन ट्रक भरून कागदपत्रे, हार्डडिस्क त्याशिवाय संस्थेच्या दोन कार पोलिसांनी एमपीआयडी कायद्यान्वये जप्त केली होती. या हार्डडिस्कमध्येच ठेवीदार, कर्जदार, संस्थेच्या मालमत्ता यासह कंडारे, झंवर यांची कुंडली होती. हा संपूर्ण महत्त्वाचा डाटा पोलिसांकडून अवसायक नासरे यांच्या ताब्यात मिळाला आहे. शुक्रवारपासून नासरे यांनी पुण्यात ठाण मांडले होते. बुधवारी हार्डडिस्क व दोन्ही कार (क्र.आर.जे.१४ सी.एक्स.०७१ तसेच क्र.एम.एच.१९ बी.यू.२३२३) घेऊन नासरे जळगावकडे रवाना झाले.
चैतन्यकुमार नासरे यांनी ८ मार्च रोजी बीएचआर पतसंस्थेच्या अवसायक पदाचा पदभार घेतला. कार्यालयाचे सील उघडण्यापासून तर जप्त हार्डडिस्क परत मिळण्यासाठी त्यांनी पुणे पोलीस व न्यायालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या गुन्ह्याचे तपासाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त भोसले, सहायक तपासाधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांची त्यांनी पुण्यात भेट घेऊन गुन्ह्यात तपासात काय निष्पन्न झाले आहे, ठेवीदारांना ठेवी परत करण्यासाठी येणाऱ्या काळातही पोलिसांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जळगाव, जामनेरातील ११ कर्जदारांनी पुणे न्यायालयात ३ कोटी १३ लाख रुपये आधीच भरले आहेत.
नगरला ठेवीदारांची बैठक
पुण्याहून जळगावला परत येत असताना नासरे यांनी अहमदनगर येथे ठेवीदार व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या जिल्ह्यातदेखील शंभराच्यावर मोठे ठेवीदार आहेत. हे सर्व ठेवीदार जळगावला येणार होते, मात्र नासरेंना त्यांनी नगरला थांबण्याची विनंती केली, त्यानुसार तेथे बुधवारी एक बैठक झाली.
दोन टप्प्यात होणार लेखापरीक्षण
बीएचआर संस्थेत लेखापरीक्षक दाखल झालेले असून पहिल्या टप्प्यात २०१५-१६ या वर्षाचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यानंतर २०१६ ते २०२१ या कालावधीतील लेखापरीक्षण केले जाईल. साधारण ऑक्टोबरपर्यंत हे कामकाज चालेल, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून ठेवीदारांना त्यांच्या कष्टाचा पैसा परत करायला सुरुवात केली जाणार आहे.
कोट....
बीएचआर संस्थेची हार्डडिस्क व दोन्ही वाहने पुणे पोलिसांकडून मिळाली आहेत. हार्डडिस्कमध्ये ९० टक्के डाटा मिळाला आहे. त्यावर आता उद्यापासूनच कामकाज सुरू होऊ शकते. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या रकमा मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ठेवीच्या रकमा परत करण्याचे नियोजन आहे. न्यायालय व पोलीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हार्डडिस्क मिळू शकली. प्रत्येक ठेवीदाराला न्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे.
- चैतन्यकुमार नासरे, अवसायक, बीएचआर