शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन.. यंदा कापसाला मिळणार दमदार भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:38+5:302021-07-23T04:11:38+5:30
अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांपासून अमेरिका व चीनमधील ट्रेडवॉरमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची ...

शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन.. यंदा कापसाला मिळणार दमदार भाव
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही वर्षांपासून अमेरिका व चीनमधील ट्रेडवॉरमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी घटली होती. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नव्हता. मात्र, यावर्षी ट्रेड वॉरचा कोणताही परिणाम कापसाच्या मागणीवर राहणार नसून, भारताची निर्यातदेखील यंदा वाढणार आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा कापसाचा पेरादेखील कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढणार असल्याने यावर्षी कापसाला हमीभावापेक्षाही जास्त भाव मिळण्याची शक्यता कापूस क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत कापसाची पेरणी १४ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्पादनात घट होणार असली तरी कापसाची मागणी यंदा वाढणार आहे. गाठींसह सरकीला सद्य:स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास सुरुवातीच्या मार्केटमध्ये खासगी बाजारातदेखील कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
भाव वाढण्याचे कारण काय ?
१. गेल्या वर्षाच्या तुलनेत कापसाची पेरणी १४ टक्क्यांनी कमी झाली आहे.
२. गेल्यावर्षी भारतातून ५० लाख क्विंटल गाठींची निर्यात झाली होती. यावर्षी ७० लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता आहे.
३. उत्पादन कमी व मागणी जास्त या सूत्रानुसार कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
४. सरकीचे व गाठींचे दरदेखील आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले आहे.
५. यासह यान (सुत)ला देखील बाजारात मागणी वाढली आहे.
६. अमेरिका-चीनचा ट्रेडवॉर संपलेला असून, आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या मालाला मागणी जास्त राहणार आहे.
कसा राहिल बाजार
१.गेल्या वर्षी कापसाला ५४५० इतका हमीभाव मिळाला होता.
२. यावर्षी सीसीआयने आंतराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी पाहता, ६ हजार रुपये इतका हमीभाव निश्चित केला आहे.
३. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कायम राहिल्यास शेतकऱ्यांचा मालाला ६ हजार ५०० प्रतिक्विंटल इतका भाव मिळण्याची शक्यता आहे.
४. तसेच मालाची गुणवत्ता चांगली राहिल्यास, भविष्यात निसर्गानेही साथ दिल्यास कापसाला ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता खान्देश जिनिंग असोसिएशनचे संचालक प्रदीप जैन यांनी वर्तविली आहे.
५. गेल्यावर्षी परतीच्या पावसामुळे राज्यातील बऱ्याच भागातील कापसाचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच गुणवत्तादेखील खराब झाली होती. अशी परिस्थिती यंदा सुदैवाने न उद्भवल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
यावर्षी अशा प्रकारे उत्पादन होण्याचा अंदाज (उत्पादन क्विंटलमध्ये)
जळगाव जिल्हा - ११ लाख गाठी
खान्देश - १५ लाख गाठी
राज्य - ६५ ते ७० लाख गाठी
भारत - ३ कोटी ५० लाख गाठी
सध्या कापसाचा भाव ७ हजार ७०० रुपयांवर
गेल्यावर्षी शेतकऱ्यांना ५४५३ इतकाच भाव मिळाला होता. कोरोनाची परिस्थिती त्यात सीसीआयच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. तसेच भविष्यात मार्केट कमी होईल या शक्यतेने फेब्रुवारी महिन्यातच सर्व शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला होता. त्यामुळे मार्च महिन्यात सीसीआयने खरेदी थांबविली होती. मात्र, त्यानंतर कापसाचा भाव वाढतच जात असून, सद्य:स्थिती कापसाला प्रति क्विंटल ७ हजार ७०० रुपये इतका प्रचंड भाव सुरू आहे.
कोट..
यावर्षी कापसाची सध्याची स्थिती पाहत गुणवत्ता चांगली राहण्याची शक्यता आहे. हीच स्थिती पुढील तीन महिने कायम राहिल्यास कापसाला हमीभावापेक्षाही चांगला भाव मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारदेखील सद्या:स्थितीत चांगले आहे. यंदा कापसाला ६ हजार ५०० इतका भाव खासगी बाजारात राहू शकतो. मागणी वाढल्यास भाव ७ हजार रुपयांपर्यंतही जाऊ शकतो.
-प्रदीप जैन, संचालक, खान्देश जिनिंग असोसिएशन
कापसाचा पेरा यंदा कमी झाला आहे. तसेच मागणीदेखील वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी निर्यातदेखील वाढणार असल्याने कापसाची मागणी ही कायम राहणार असल्याने खासगी बाजारात कापसाचे दर ६ हजारपेक्षा कमी होणारच नाही. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल हे नक्की.
-हर्षल नारखेडे, जिनर्स तथा आंतराष्ट्रीय कॉटन बाजाराचे अभ्यासक